पुणे : राज्यात दैनंदिन आठ लाख टन क्षमतेने गाळप सुरू असून २१ डिसेंबरअखेर ३२३.२७ लाख टन उसाचे गाळप करून २८५.८८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. आगामी काळात उताऱ्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात सहकारी ९४ आणि खासगी ९८, अशा एकूण १९२ कारखाने गाळप करीत आहेत. पुणे आणि कोल्हापूर विभागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दराच्या आंदोलनामुळे हंगाम उशीरा सुरू झाला. आता गाळप आणि साखर उत्पादनात कोल्हापूर आणि पुणे विभागाने आघाडी घेतली आहे.
राज्यात २८५.९९ लाख क्विंटलपैकी कोल्हापूर विभागाने ९.७९ साखर उताऱ्यासह ६६.७३ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. त्याखालोखाल पुणे विभागाने ६६.५७ लाख क्विंटल, सोलापूर ५७.६ लाख क्विंटल, नगर ३६.४६ लाख क्विंटल, औरंगाबाद २३.१७ लाख क्विंटल, नांदेड ३२.६६ क्विंटल, अमरावती २.५४ आणि नागपूर विभागाने ०.१५ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. गतीने ऊस गाळप सुरू असल्याचे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावर यांनी सांगितले.