यंदाच्या हंगामात महाराष्ट्राचा ऊस कर्नाटकात जाण्याला लागणार ‘ब्रेक’!

कोल्हापूर : यंदा महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारखाने एकाच दिवशी म्हणजेच 15 नोव्हेंबरला सुरु होणार असल्याने महाराष्ट्रातून कर्नाटकात होणाऱ्या उसाच्या पळवापळवीला ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता आहे. कारण दरवर्षी कर्नाटकातील कारखाने अगोदर सुरु होतात आणि कोल्हापूर आणि सांगलीच्या सीमाभागातील ऊस मोठ्या प्रमाणात गाळपासाठी नेतात. त्याचा फटका महाराष्ट्रातील सीमाभागातील कारखान्यांना बसतो.

सीमेवरच्या गावांचा बहुतांशी ऊस दोन्ही राज्यातील कारखान्यांमध्ये विभागला जातो. यंदा मात्र ऊस दारासाठी शेतकरी संघटनांनी जर आंदोलनाचे हत्यार उपसले नाही तर दोन्ही राज्यांच्या तोडी एकदम सुरू होतील. यामुळे पळवापळवीवर निर्बंध येतील. हंगाम तारीख निश्चित झाली असली अद्याप तरी कोणत्याही संघटनेने यंदाची भूमिका स्पष्ट केलेली नाही.

कोल्हापूर जिल्ह्यातील २३ कारखान्यांकडे १८७ लाख हेक्टर उसाची नोंद झाली आहे. त्यातून १४० लाख टन उस उपलब्ध होणार आहे. सांगली जिल्ह्यातील १७ कारखान्यांकडे १३७ लाख हेक्टर ऊस नोंद झाली आहे. त्यातून १२५ लाख टन ऊस उपलब्ध होऊ शकतो. कोल्हापुरातील २३ कारखान्यांची प्रतिदिन गाळप क्षमता १ लाख ३७ हजार टन तर सांगली जिल्ह्यातील १७ कारखान्यांची प्रतिदिन गाळप क्षमता ८८ हजार टन इतकी आहे. म्हणजे काल्हापूर विभागात एकूण तोडणीचा ऊस २५५ लाख टन इतका आहे. विभागाची गाळप क्षमता २ लाख २५ हजार टन प्रतिदिन इतकी आहे. म्हणजे या विभागातील गाळप हंगाम १२० ते १२५ दिवस इतका चालण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here