देहरादून : राज्य अन्नधान्य योजनेंअंतर्गत पहिल्यांदाच उत्तराखंडमध्ये रेशनकार्डधारकांना स्वस्त साखर देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेचा लाभ राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजना आणि उर्वरीत सर्व २३.८० लाख रेशन कार्डधारकांना होणार आहे. राज्यात कोरोनाच्या महामारीमुळे त्रस्त झालेल्या जनतेला स्वस्त साखर देण्याच्या माध्यमातून सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजनेशी जोडलेल्या १३ लाखहून अधिक रेशन कार्डधारकांना केंद्र सरकारतर्फे धान्य दिले जात आहे. यापैकी फक्त अंत्योदय योजनेअंतर्गत दीड लाख रेशन कार्डधारकांना केंद्राकडून प्रती कार्डधारकास एक किलो साखर १३.५० रुपये प्रती किलो दराने मिळते. आता सर्व रेशन कार्डधारकांना स्वस्त साखर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत सरकारने दोन्ही योजनेतील रेशन कार्डधारकांना दिलासा देत २५ रुपये प्रती किलो दराने प्रत्येक कार्डधारकास दोन किलो साखर पुढील तीन महिने मिळेल. एक किलो साखर बाजारभावापेक्षा १५ रुपये कमी दराने मिळेल. ही साखर राज्य सहकारी साखर कारखान्यांकडून खरेदी केली जाईल.
मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी सांगितले की, कोरोना महामारीचा प्रकोप पाहता सर्व रेशन कार्डधारकांना स्वस्त साखर देण्याचा प्रयत्न आहे. याचा लाभ २३ लाखांहून अधिक रेशन कार्डधारकांना मिळेल. सरकारला सर्वसामान्य जनतेची काळजी आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्याचे आमचे प्रयत्न आहेत.