कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून ऊस पिकाला चांगला दर मिळू लागला आहे. परंतु मजूर टंचाईच्या समस्येने डोके वर काढले आहे. ऊस तोडणी मजूर मिळत नसल्याने हंगामात शेतकऱ्यांनाच हाती कोयता घ्यावा लागतो. यंदाही तशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. पूर्वी ऊस पट्ट्यात तोडणीसाठी दुष्काळी भागातून मजूर यायचे. मात्र अलीकडच्या काही वर्षापासून यातील बहुतांशी मजुरांनी याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे गावागावात तोडणी मजूर तयार झाले आहेत. मात्र वेळ आणि गरजेनुसार तयार झालेल्या या मजुरांतील अनेकांनी यापूर्वी कधी ऊस तोडलेला नाही. त्यामुळे सकाळी उठल्यापासून ते फडात कामाला येईपर्यंत या मजुरांची डोकेदुखी टोळीमालकाला सहन करावी लागत आहे.
आता महिना, दीड महिन्यानंतर कारखान्याचा हंगाम सुरू होणार आहे. पूर्वीच कारखान्याकडून मुकादम, तोडणी मजूर आणि वाहनधारक यांच्याशी करार केला जायचे. मात्र, अलिकडे मुकादम यांचेकडून वाहनधारकांना टोळी देण्याच्या नावाने लाखो रुपये घेतले जात आहे. आणि मजूर टोळीच दिली जात नाही. यामुळे मुकादमांकडून होत असलेली फसवणूक पाहता, तोडणी मजूर टंचाईचा सामना शेतीला करावा लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याला पर्यायी व्यवस्था म्हणून गावातील वाहनधारक या व्यवसायाकडे वळत आहेत. या ठिकाणचे बेरोजगार आणि ऊस तोडणी मजूर टोळ्या तयार होत आहेत. तशाच उसाला तोड आली असल्याने स्वतः शेतकरी हातात कोयता घेवून ऊस तोडताना दिसत आहे. ऊस फडात बाहेर गावचे तोडणी मजूर नसून गावातील शेतकरी काम करत आहेत. एकूणच मजुरांअभावी ऊस शेतीची वाट खडतर बनेल, यात शंका नाही.