लखनौ : राज्यातील विविध विरोधी पक्षांचे नेते, शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी उत्तर प्रदेशातील ऊसाच्या खरेदी दरात २५ रुपयांची वाढ अपुरी असल्याचा हल्लाबोल केला आहे. गेल्या काही वर्षांत या पिकाचा उत्पादन खर्च कित्येक पट वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी राज्याच्या ऊस खरेदी दरात २५ रुपये प्रती क्विंटलची वाढ करण्याची घोषणा केली. त्यानंतर ३५० रुपये प्रती क्विंटल दर झाला आहे.
भारतीय किसान संघाचे (बिकेयू) नेते राकेश टिकैत यांनी मुझफ्फरनगर येथे बिकेयूचे माध्यम प्रमुख धर्मेंद्र मलिक यांच्याद्वारे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. शेतकऱ्यांना २५ रुपये प्रती क्विंटल दरवाढ मंजूर नाही. शेजारील राज्यांमध्ये डिझेल स्वस्त आहे. ऊसाचे दर अधिक आहेत असा दावा टिकैत यांनी केला. ते म्हणाले, उत्तर प्रदेशात डिझेलचे दर सर्वाधिक असल्याने राज्य सरकारकडून केलेली दरवाढ अपुरी आहे.
सरकारने संकल्प पत्रामध्ये ऊस दर ३७५ रुपये प्रती क्विंटल करण्याची घोषणा केली होती. मात्र, आताचा दर हरियाणा आणि पंजाबच्या तुलनेत कमी आहेत. शेतीसाठी होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत ४२५ रुपये दर मिळावा अशी मागणी आहे.
गेल्या दहा महिन्यांपासून शेतकरी पिकांच्या अपुऱ्या दरवाढीबाबत विरोध करीत असल्याचे टिकैत यांनी म्हटले आहे. समाजवादी पक्षाचे नेते आणि राज्य योजना आयोगाचे माजी सदस्य प्रा. सुधीर पवार यांनी राज्य सरकारकडून साखर उत्पादनात पहिल्या क्रमांकावर असल्याचा केला जाणारा दावा या दरवाढीनंतर फोल ठरला आहे. राष्ट्रीय लोक दलाचे वरिष्ठ नेते राजकुमार सांगवान यांनी ही उत्पादन खर्च अधिक असल्याने ही दरवाढ अपुरी असल्याचे सांगितले. खरेदी दरातील ही किरकोळ वाढ म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जनता सरकारला धडा शिकवतील असे सांगवान म्हणाले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link