अहमदनगर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी अशोक साखर कारखान्याच्या नवीन ६० हजार लिटर क्षमतेची डिस्टीलरी, ६० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प, इन्सीनरेशन बॉयलर आदींचे उद्घाटन होणार आहे. सकाळी ११ वाजता कारखान्याचे चेअरमन भानुदास मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी दिली.
कार्यकारी संचालक संतोष देवकर म्हणाले की, कारखान्याचा सध्या प्रती दिन ४० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प आहे. आता नव्या ६० हजार लिटर क्षमतेच्या डिस्टीलरी प्रकल्पामुळे प्रतिदिन १ लाख लिटरपर्यंत अल्कोहोल उत्पादन होईल. नवीन ६० हजार लिटर क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पामुळे प्रतिदिन १ लाख लिटरपर्यंत इथेनॉल निर्मिती होणार आहे. २२ टीपीएच (टन प्रती तास) क्षमतेच्या नव्या इन्सीनरेशन बॉयलरमुळे प्रती तास २ मेगावॉट वीज निर्मिती होईल. त्यावर डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्प चालणार आहे.