कोल्हापूर : जिल्ह्यातील काही तालुक्यात आडसाली ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिरोळ तालुक्यात रोगाचा प्रादुर्भाव जास्त पाहायला मिळत आहे. ऊसाची पाने पिवळी पडून त्यावर लाल ठिबके पडत आहेत. को २६५ जातीच्या ऊसावर हा प्रादुर्भाव दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. भरणी केलेल्या ऊसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यात ढगाळ वातावरण आणि वाढती थंडी यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे ऊस उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाढ सुरु असलेल्या उसाची पाने अचानक पिवळी पडून लालसर ठिपके पडू लागले आहेत. याचा उसाच्या वाढीवर विपरीत परिणाम होत आहे. संपूर्ण पावसाळ्यात एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे विहीर आणि कूपनलिकात अपूरे पाणी आहे. तारेवरची कसरत करुन शेतकरी ऊस पीक जगवत आहेत. पण अचानक या रोगाने थैमान घातल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हवामानातील बदलामुळे मोठ्या प्रमाणात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव को २६५ या जातीच्या उसावर दिसून येत आहे. तरी शेतकऱ्यांनी प्रोपेकोनेझोल घटक असलेले टिल्ट प्रती पंप १५ मिली वापरुन फवारणी करावी, असे कृषी तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.