नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने बसपच्या अध्यक्ष मायावती यांच्या भावाची ४०० कोटी रुपयांची जमीन जप्त केली. मायावती यांचे बंधू आनंद कुमार आणि त्यांची पत्नी लता यांची नोएडा परिसरात सात एकर जमीन होती. त्याची बाजारातील किंमत ४०० कोटी रुपये आहे. कुमार यांची ही मालमत्ता बेहिशेबी असल्याने प्राप्तिकर विभागाने दिल्लीतील बेहिशेबी मालमत्ता प्रतिबंध विभागाच्या अंतर्गत १६ जुलैला देण्यात आलेल्या आदेशानुसार ही मालमत्ता जप्त केली. विशेष म्हणजे मायावती यांनी कुमार यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर काही दिवसांतच ही कारवाई झाली आहे.
बेहिशेबी मलामत्ता कायद्यातील कलम २४-३ अंतर्गत कुमार आणि त्यांच्या पत्नीच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रतिबंध कायद्यानुसार संबंधिताला सात वर्षांच्या कारवासाची शिक्षा होऊ शकते किंवा मालमत्तेच्या बाजारातील किंमतीच्या २५ टक्के किंमत त्याला दंड स्वरूपात भरावी लागते. मोदी सरकारने पहिल्या टर्ममध्ये सत्ते आल्यानंतर बेहिशेबी मालमत्ता प्रतिबंध कायद्यात सुधारणा केल्या होत्या. त्या सुधारीत कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार केवळ प्राप्तिकर खात्यालाच आहे.