कोल्हापूर : चीनीमंडी
कोल्हापूर जिल्ह्यातील सर सेनापती संताजीराव घोरपडे सहकारी साखर कारखान्यावर आज प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. हा साखर कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते हसन मुश्रीफ यांचा आहे. त्यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ सध्या साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. प्राप्तिकर विभागाने मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानाबरोबरच साखर कारखान्यावरही छापा टाकला आहे. मुश्रीफ हे जनमानसातील नेतृत्व असल्यामुळे या छाप्याचे पडसाद उमटले आहेत. सोशल मीडियावर मुश्रीफ यांच्या विषयी प्रचंड सहानुभूती व्यक्त करण्यात येत आहे. तर काही मुश्रीफ समर्थकांनी कागलमध्ये त्यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली असून, त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यास सुरुवात केली आहे. निवासस्थानाबाहेर प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
संताजी घोरपडे साखर कारखाना कागल तालुक्यातील सेनापती कापशी-बेळेवाडी काळम्मा येथे आहे. २०११ मध्ये या साखर कारखान्याची स्थापना झाली. कारखाना सभासदांना विना कपात पहिली उचल देणारा साखर कारखाना म्हणून या कारखान्याची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची उभारणी झाली आहे. सध्या कारखान्याचे गाळप बंद असले तरी छाप्यानंतर प्रशासकीय काम थांबवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. हसन मुश्रीफ आज, सकाळी महालक्ष्मी एक्स्प्रेसने मुंबईहून कोल्हापूरला परतले. सकाळी आठच्या सुमारास ते कागलमधील निवासस्थानी पोहोचल्यानंतर प्राप्तिकर विभागाने कारवाई सुरू केली. यावेळी मुश्रीफ यांना नेहमीप्रमाणे भेटायला आलेल्या मतदारसंघातील नागरिकांची गर्दी होती. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आलेल्या पोलिसांनी ती गर्दी पांगवली आणि कारवाईला सुरुवात केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
गेल्या आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. मुश्रीफ हे कट्टर शरद पवार समर्थक मानले जातात. त्यामुळे सहाजिकच त्यांनी चंद्रकांत पाटील यांची ऑफर नाकारली. त्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या निवासस्थानी आणि कारखान्यावर छापा पडल्याने मुश्रीफांवर दबाव टाकला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुश्रीफ यांचे जवळचे सहकारी आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने म्हणाले, ‘भाजप प्रवेशाची ऑफर नाकारल्यामुळचं मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर तसेच संताजी घोरपडे कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे. मुश्रीफ यांच्या घरात प्राप्तिकर विभागाला मोर पिसे सापडतील.’ साखर घोरपडे सहकारी साखर कारखान्याचे ४० हजार सभासद आहेत. प्रत्येकी दहा हजार रुपये शेअर प्रमाणे सभासदांनी कारखान्यात गुंतवणूक केली आहे. यापूर्वीही प्राप्तिकर विभागाकडे तक्रार झाली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीतही फारसे काही निष्पन्न झाले नसल्याचे भैय्या माने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.