कोल्हापूर : मॉन्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्याने कर्नाटकमध्ये मे महिन्याच्या उत्तरार्धापासून उसाची लागवड अचानक वाढली आहे. त्यामुळे रोपांच्या मागणीतही वाढ झाली. त्याचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातील ऊस रोपवाटिकांवर झाला आहे. या सकारात्मक घडामोडींमुळे रोपवाटिकांचे अर्थकारण सुधारले आहे. रोपांच्या दरात प्रती रोप सरासरी ८० पैशांपर्यंत वाढ झाली आहे. कर्नाटकात ०२६५ ऊस प्रजातींच्या रोपांना सर्वाधिक मागणी आहे. याबरोबरच मराठवाडा, विदर्भात ८६०३२, १०००१, १८१२१ या रोपांना मागणी आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील ऊस रोपवाटिकांची शेतकऱ्यांबरोबर राज्याच्या अन्य भागांतील रोपवाटिका चालकांकडूनही मागणी आहे.
गेल्यावर्षी कमी पावसामुळे उसाच्या लागवडी लांबल्या. स्थानिक तसेच बाहेरगावच्या मागणीवर परिणाम झाल्याने ऊस रोपवाटिकांत तयार झालेली रोपे अक्षरशः जनावरांच्या चाऱ्यासाठी देण्यात आली. अनेकांना रोपवाटिका व्यवसाय अनेकांना बंद करण्याची वेळ आली. मात्र, मे महिन्याच्या मध्यापासून कर्नाटकमधून मागणी वाढू लागली. याचा फायदा रोपवाटिका चालकांना होत आहे. मराठवाडा, विदर्भ, दक्षिण सोलापूर, कर्नाटक भागांतून बरोबरच गुजरातेतील कारखान्यांलकडूनही मागणी वाढेल, असा आशावाद रोपवाटिका चालकांचा आहे. चांगला पाऊस झाल्यास गेल्यावर्षी झालेला तोटा काही प्रमाणात तरी भरून निघण्याची शक्यता आहे, असे रोपवाटिका चालकातून सांगण्यात येत आहे.