‘करोडपती’ करदात्यांमध्ये वाढ

कोल्हापूर : वार्षिक एक कोटी रुपये आणि अधिक करपात्र उत्पन्न असणार्‍या देशातील व्यक्तिगत प्राप्तिकर दात्यांच्या संख्या गेल्या वित्त वर्षांत तब्बल 1 लाखाच्या उंबरठयावर आहे. अहवालानुसार, 1 कोटीहून अधिक उत्पन्न दाखवणार्‍या करदात्यांची संख्या 97,689 इतकी आहे. ही संख्या 2017-18 मध्ये 81 हजार 344 इतकी होती. यामध्ये पगारदार करदात्यांची संख्या 41 हजार 457 इतकी होती ती आता 49 हजार 128 वर गेली आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जाहीर केलेल्या श्रीमंत करदात्यामध्ये व्यक्तिगत करदाते, हिंदू अविभक्त कुटुंबीय, कंपन्या, आस्थापना अशा एकूण 1.67 लाख जणांचे प्राप्तिकर उत्पन्न एक कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट केले. अशा श्रीमंतांची संख्या आधीच्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढली आहे. नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर आणि अर्थव्यवस्थेची गती मंदावण्यास सुरुवात झाली असताना करोडपती उत्पन्न असणार्‍या करदात्यांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे.

अहवालानुसार, उद्योगसमुह, हिंदू अविभक्त कुटुंब कायद्यांतर्गत नोंदणी झालेल्या संस्था आणि व्यक्तिगत करदाते यांनी एकत्रित  1 कोटीपेक्षा अधिक उत्पन्न दाखविलेल्यांची संख्या 1 लाख 67 हजार इतकी आहे. त्यामागील वर्षात ही संख्या 1 लाख 33 हजार होती. या वर्षात 2 कोटी 62 लाख करदात्यांनी करपात्र उत्पन्न नसल्याचे परतावे दाखल केले आहेत. तर 5 ते साडेनउ लाख रुपये उत्पन्न दाखविणार्‍या करदात्यांची संख्या 82 लाख इतकी आहे. 2 हजार 85 व्यक्तींनी घरभाड्यापासून मिळणारे उत्पन्न 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक दाखविले असून 17 हजार 320 व्यापार उद्योग पेढ्यांनी आपले उत्पन्न 1 कोटीपेक्षा अधिक असल्याचे म्हटले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here