देशभरात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम गतीने सुरू आहे. मुख्य साखर उत्पादक राज्यांत गेल्या हंगामाच्या तुलनेत आतापर्यंत समान कामगिरी झाली आहे. कर्नाटकमध्ये मात्र गेल्या हंगामाच्या तुलनेत आतापर्यंत जादा साखर उत्पादन झाली आहे. याशिवाय हंगामात गाळप करीत असलेल्या साखर कारखान्यांची संख्याही वाढली आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकमध्ये ७० साखर कारखाने सुरू असून त्यांनी १५ जानेवारी २०२२ पर्यंत ३३.२० लाख टन साखर उत्पादित केली आहे. तर २०२०-२१ या हंगामात ६६ कारखान्यांनी १५ जानेवारी २०२१ अखेर २९.८० लाख टन साखर उत्पादन घेतले होते.
देशपातळीवर विचार करता, १५ जानेवारी २०२२ पर्यंत देशात ५०४ साखर कारखाने सुरू असून त्यांनी १५१.४१ लाख टन साखर उत्पादन केले आहे. गेल्यावर्षी, १५ जानेवारी २०२१ पर्यंत देशात ४८७ साखर कारखान्यांनी १४२.७८ लाख टन साखर उत्पादन केले होते. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा आजापर्यंत ८.६३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे.