सांगली : ऊस विकासाच्या विविध योजना दालमिया भारत शुगरचे युनिट असलेल्या निनाईदेवी कारखान्याने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवल्या. त्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना ऊस उत्पादनवाढीसाठी फायदा झाला, असे मत ‘दालमिया शुगर’चे युनिट हेड संतोष कुंभार यांनी केले. औंड (ता. कराड) येथे आयोजित ऊस शेतकरी परिषदेत ते बोलत होते. यावेळी शेतकऱ्यांना अधिक ऊस उत्पादनासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते माती पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. डेप्युटी जनरल मॅनेजर सुधीर पाटील, ऊस विकास तज्ज्ञ अमोल आंधळे यांनी ऊस उत्पादनाची सद्यस्थिती व शाश्वत ऊस विकासाबाबत मार्गदर्शन केले. सिनिआर केन मॅनेजर युवराज चव्हाण यांनी मागील तीन वर्षात कारखान्याद्वारे शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजना, उत्पादनवाढीसाठी केलेले प्रयत्न व उत्पन्न वाढीचा आलेख मांडला. यावेळी एच. आर. हेड महेशकुमार देसाई, निवृत्ती नायकवडी, ज्ञानदेव पाटील, सतीश यादव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.