सध्या देशात खरीप पिकांची पेरणी शेवटच्या टप्प्यात सुरू आहे. यामध्ये कडधान्य पिकांच्या पेरणीत सुधारणा दिसून येत आहे. सुरुवातीला डाळींच्या पेरणीत १० टक्क्यांहून अधिक घट दिसून आली होती. आता ही घट ८ टक्क्यांवर आली आहे. खरीपातील मुख्य पीक असलेल्या भाताच्या पेरणीत ३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सोयाबीन, बाजरी, मका पिकाखालील क्षेत्रातही वाढ झाली आहे. मूग, ज्वारी, भुईमूग आणि कापसाच्या लागवड क्षेत्रात घट दिसून आली आहे.
बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उपलब्ध सरकारी आकडेवारीनुसार असे दिसून येते की, एक सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात १०.७७ कोटी हेक्टरमध्ये पिकांची पेरणी झाली आहे. गेल्यावर्षीच्या समान कालावधीत ही पेरणी ०.४५ टक्के जास्त आहे. भाताच्या पेरणीत ३.७३ टक्क्यांची वाढ होवून ती ३.९८ कोटी हेक्टरपर्यंत झाली आहे. ऊसाचे लागवड क्षेत्र ७.६६ टक्के वाढून ५९.९२ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. तर कापसाच्या लागवड क्षेत्रात २.११ टक्क्यांची घट होवून ते १२३ लाख हेक्टरवर आले आहे.
या आठवड्यापर्यंत कडधान्य पिकांची पेरणी ११९.०९ लाख हेक्टरवर झाली आहे. मागील वर्षीच्या समान कालावधीतील १३०.१३ लाख हेक्टर पेरणीपेक्षा ही लागवड ८.४८ टक्के कमी आहे. पेरणीच्या सुरुवातीला कडधान्य पिकाखालील क्षेत्रात १० टक्क्यांहून अधिक घट होत होती. आता ही घसरण ८ टक्क्यांच्या आसपास आली आहे. मुग लागवड क्षेत्र ७.७२ टक्क्यांनी घटून ३०.९८ लाख हेक्टर आणि उडीदाचे क्षेत्र १३.५६ टक्क्यांनी घटून ३१.६८ लाख हेक्टरवर आले आहे.