मुंबई / कोल्हापूर : 2022-23 च्या हंगामात साखर उत्पादनात झालेली घट, इथेनॉल उत्पादनासाठी साखरेचा वाढता वापर, एल निनोमुळे संभाव्य दुष्काळाचे सावट आणि पुढील वर्षीही उत्पादनात घट होण्याची शक्यता यामुळे स्थानिक बाजारात साखरेच्या दरात तेजी पहायला मिळत आहे.
कृषी मालाबाबत विश्लेषण आणि संशोधन करणाऱ्या Agrimandi.live कंपनीच्या म्हणण्यानुसार, गेल्या एका आठवड्यात साखरेच्या दरात प्रति क्विंटल 30 ते 80 रुपयांनी वाढ झाली आहे. कोल्हापुरात साखरेचे एक्स मिल भाव गेल्या एका आठवड्यात 3400 ते 3480 रुपये प्रति क्विंटल, तर मुझफ्फरनगरमध्ये 3650 ते 3680 रुपये प्रति क्विंटल होते.
अथर्व इंटरट्रेडचे मानसिंग खोराटे म्हणाले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन घटले आहे. त्याचबरोबर साखरेचा साठाही तुलनेने कमी आहे. यंदा पाऊस लांबल्याने त्याचा पुढील वर्षीच्या साखर उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून आपण स्थानिक बाजारपेठेत साखरेच्या किमतीत वाढ पाहत आहोत.
किरकोळ बाजाराबाबत बोलायचे झाले तर सुविधा ट्रेडर्सचे मालक पवन मोहिते म्हणाले की, किरकोळ बाजारात ४० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या साखरेच्या दरात गेल्या पंधरा दिवसांत दोन रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या साखर 42 रुपये किलोने विकली जात आहे.
यंदा साखर उत्पादनात मोठी घट
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात मोठी घट झाली आहे. गतवर्षी अवकाळी पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले होते. त्याचा परिणाम यंदा साखर उत्पादनावर दिसून येत आहे. 15 एप्रिल 2023 अखेर देशात 311 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे. इथेनॉल निर्मितीसाठी 40 लाख मेट्रिक टन साखर वापरली गेली.
केंद्र सरकारची 60 लाख टन साखर निर्यातीला परवानगी
देशांतर्गत बाजारपेठेत साखरेचे दर स्थिर राहण्यासाठी आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने यंदा केवळ 6 दशलक्ष टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. 2021-22 मध्ये भारताने विक्रमी 11 दशलक्ष टन साखर निर्यात केली. त्या तुलनेत यंदा सरकारने कमी निर्यात कोटा दिल्याने हा निर्यातीचा कोटाही पूर्ण झाला आहे.
सणासुदीच्या काळात दरात आणखी वाढ होण्याची शक्यता…
येत्या काही महिन्यांत महाराष्ट्रात तसेच देशात सणांचा हंगाम सुरू होणार आहे. त्यामुळे साखरेच्या मागणीत वाढ होण्याबरोबरच दरातही मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा जागतिक बाजारपेठेबरोबरच देशांतर्गत बाजारातही साखरेचे भाव उच्च पातळीवर पाहायला मिळू शकतात.