नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात वाढ सुरूच आहे. अलिकडेच प्रमुख बाजारपेठांमध्ये खालच्या स्तरापासून साखरेचा दर जवळपास २०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत वाढले आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये जेव्हा गळीत हंगाम सर्वोच्च स्तरावर होता, तेव्हा मध्य युपीमध्ये (एम-ग्रेड) आणि पश्चिम महाराष्ट्र (एस-ग्रेड) साखरेच्या किमती अनुक्रमे ३७००-३८०० रुपये आणि ३४००-३४२० रुपये प्रती क्विंटल यादरम्यान होत्या.
उन्हाळ्यासोबतच साखरेच्या दरातही वाढ…
एप्रिलच्या अखेरीस साखरेचे दर वाढू लागले. १७ एप्रिल रोजी कडक उन्हाळा आणि सणासुदीमुळे वाढलेली मागणी यामुळे साखरेचे दर प्रती क्विंटल जवळपास १०० रुपयांनी वाढले. मध्य यूपी (एम-ग्रेड) साखरेचे दर प्रती क्विंटल ३८९० ते ३९०० रुपये, तर पश्चिम महाराष्ट्रात (एस-ग्रेड) साखरेचे दर सुमारे ३५०० ते ३५५० रुपये प्रती क्विंटल होते. त्यानंतर साखरेच्या दरवाढीचा कल कायम आहे. साखर दरात प्रती क्विंटल ९० ते १०० रुपयांनी वाढ झाली आहे, तर उत्तर प्रदेशात दर प्रती क्विंटल ४० ते ५० रुपयांनी वाढले आहेत.
२ मे रोजी महाराष्ट्रात साखरेचा दर ३६२५ ते ३६५० रुपये प्रती क्विंटल (एस-ग्रेड साखर) आणि एम-ग्रेड साखरेचा दर ३७०० ते ३७४० रुपये प्रती क्विंटल होता. मुझफ्फरनगरमध्ये एम दर्जाची साखर ३९२० ते ३९४० रुपये प्रती क्विंटल होती. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, केंद्र सरकारकडून साखरेच्या ‘एमएसपी’मध्ये वाढ होण्याच्या हालचाली सुरु असल्यामुळे देशांतर्गत बाजारात साखरेच्या किंमती वाढल्या आहेत.
SIEC 2024 मध्ये करण्यात आली होती अचूक भविष्यवाणी…
नवी दिल्ली येथे फेब्रुवारी २०२४ मध्ये पार पडलेल्या साखर आणि इथेनॉल इंडिया कॉन्फरन्स (SIEC 2024) मध्ये चालू हंगामातील ऊस गाळप हंगामाच्या अंतिम टप्प्यात देशांतर्गत साखरेच्या किंमत वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला होता. ‘साखर : तेजी… की मंदी..?’ (देशांतर्गत साखर व्यापारातील गतिशीलता आणि ट्रेंड एक्सप्लोरिंग) या चर्चात्मक सत्रामध्ये एमआयईआर कमोडिटीजचे संचालक राहिल शेख, समर्पण शुगरचे संचालक जनेश पटेल, केएस कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आतिश नारंग आणि eBuySugar.comचे सह-संस्थापक आणि उप सीईओ हेमंत शाह यांचा समावेश होता. त्यांनी पॅनल डिस्कशनमध्ये भारतातील साखरेच्या तेजीचा दृष्टिकोन मांडला होता.
साखर उद्योगातील दिग्गजांचे अचूक मत…
समर्पण शुगरचे संचालक जनेश पटेल म्हणाले होते की, विशेषत: महाराष्ट्रात साखरेचे भाव खालच्या पातळीवर आले आहेत. केएस कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आतिश नारंग आणि एमआयईआर कमोडिटीजचे एमडी राहिल शेख यांनी साखरेच्या किमती वाढण्याची शक्यता असल्याच्या तथ्याशी सहमती दर्शवली होती. eBuySugar.com चे सह-संस्थापक आणि डेप्युटी सीईओ हेमंत शहा यांचा निष्कर्ष सर्वात अचूक होता. त्यांनी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील अपेक्षित साखरेच्या वाढीची किंमत श्रेणी दिली होती. महाराष्ट्रामध्ये भविष्यात साखरेचे दर ३७ ते ३८ रुपये किलोपर्यंत पोहोचू शकतात, असे ते म्हणाले होते. ते म्हणाले होते की, उत्तर प्रदेशमध्ये साखरेचे दर ३९-४० रुपये प्रती किलो होण्याची अपेक्षा आहे. SIEC च्या माध्यमातून भारत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेचा व्यापार, किंमत, उत्पादन आदीबाबत जागतिक साखर उद्योग आणि त्याच्याशी संबधित घटकांना एक निश्चित दिशा मिळते.