नवी दिल्ली : एन.सी.डी.सी. कडील साखर कारखान्याच्या साखर मालतारण कर्जावरील मुल्यांकन दर वाढविण्यात यावेत, अशी मागणी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी केंद्रीय रस्ते विकास व परिवहन मंत्री नितीन गडकरी तसेच एन.सी.डी.सी.चे कार्यकारी संचालक पंकजकुमार बंसल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
राज्यातील साखर कारखाने एन.सी.डी.सी. कडून साखर मालतारण कर्ज उपलब्ध करून घेतात. त्यांना सध्या साखर मालतारण कर्जावरील उचलीचा प्रति क्विंटल दर ३५०० रुपये इतका असून त्यामधून पंधरा टक्के मार्जिन मनी रक्कम वजा जाता फक्त २६३५ रुपये प्रति क्विंटल इतकीच रक्कम कारखान्यांना उपलब्ध होत आहे. तथापि दि. महाराष्ट्र राज्य सहकारी बैंक त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकांकडून साखर मालतारण कर्जावरील उचलीचा दर प्रति क्विंटल ३४०० ते ३५०० रुपयांपर्यंत आहे.
साखरेचा बाजारभाव प्रति क्विंटल ३५०० ते ३७०० रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे एन.सी.डी.सी कडून साखर मालतारण कर्जावरील मिळणारा उचलीचा दर कमी असल्यामुळे साखर कारखान्यांना ऊस बिलाची रक्कम, व तोडणी वाहतूक खर्चासाठी रक्कम कमी उपलब्ध होत असल्याचे चेअरमन परिचारक यांनी मंत्री गडकरी आणि पंकजकुमार बंसल यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यास अनुसरून मंत्री नितीन गडकरी यांनी एन.सी.डी.सी. चे कार्यकारी संचालक पंकजकुमार बंसल यांना फोनवरून सूचना दिल्या. परिचारक यांनीही बंसल याना भेटून साखरेचा मूल्यांकन दर वाढविण्याची विनंती केली. आठवड्यात याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे बंसल यांनी सांगितले.