एमएसपीसह इथेनॉलच्या खरेदीदरात वाढ करा : शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी

नवी दिल्ली : अडचणीत आलेल्या साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) प्रतिक्विंटलला ४,०५१ रुपये करावा, अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या शिष्टमंडळाने ६ डिसेंबर रोजी पवार यांची भेट घेऊन साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यास अनुसरून पवार यांनी केंद्र सरकारला निवेदन देऊन विविध मागण्या केल्या आहेत.

याबाबत पवार यांनी निवेदनात म्हटले आहे की, देशात साखरेचे दर प्रती क्विंटल ३३०० ते ३३५० रुपयांपर्यंत घसरले आहेत. यंदाच्या हंगामात उसाची एफआरपी प्रती टन ३४०० रुपये आहे. साखरेचा दर एफआरपीच्या दरापेक्षा कमी आल्याने एमएसपीत वाढ करणे गरजेचे आहे. याचबरोबर इथेनॉलच्या खरेदीदरातही वाढ करण्याची गरज आहे. साखरेचे दर घसरल्यामुळे सध्या साखर उद्योग रोखीच्या तोट्यामुळे गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याच्या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. शिवाय, उसाचा रस सिरप, बी-हेवी मळी आणि सी हेवी मळीपासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या किमतीमध्ये वाढ करण्याची मागणी यापूर्वीही १५ जून २०२४ रोजी केली होती असेही पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here