कोल्हापूर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाजारातील साखरेच्या दरावर सरकार नियंत्रण ठेवण्याची शक्यता आहे. साखर निर्यात धोरणावरही मर्यादा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी साखरेचा दर प्रती क्विंटल ३६०० ते ३७०० पर्यंत जाणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केले. हमीदवाडा – कागल येथील सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना बॉयलर अग्निप्रदीपन समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री भरमू पाटील प्रमुख उपस्थित होते.
खा. मंडलिक म्हणाले की, बाजारपेठेत इतर वस्तूंचे दर भरमसाठ वाढले आहेत. मात्र, केवळ साखर दरावरच नियंत्रण आणणे योग्य नाही. सुशिक्षित तरुणांनी मालक म्हणून शेतीत काम करण्याची गरज आहे. या भागातील बिद्री, संताजी, शाहू, हालसिद्धनाथ या साखर कारखान्यांनी गाळप क्षमता १० हजारांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम दोन ते अडीच महिन्यातच संपेल. त्यामुळे आपल्या कारखान्यालाही गाळप क्षमता वाढविण्याशिवाय पर्याय नाही.
आमदार जयंत पाटील म्हणाले, साखर कारखानदारी टिकण्यासाठी मर्यादित कर्मचारी, कमी प्रशासकीय खर्च गरजेचा आहे. साखरेबरोबर उपपदार्थ निर्मितीवर भर द्यावा. यावेळी कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील यांनी स्वागत केले. प्रा. रवींद्र शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष शिवाजीराव इंगळे, संचालक अॅड वीरेंद्र मंडलिक, कैलास जाधव, प्रकाश पाटील , मंगल तुकान, पुंडलिक पाटील, विश्वास कुराडे, प्रदीप चव्हाण, चित्रगुप्त प्रभावळकर, प्रा. संभाजी मोरे, तुकाराम ढोले, आनंदा फराकटे, कृष्णा शिंदे, सत्यजित पाटील, धनाजी बाचणकर, महेश घाटगे, विष्णू बुबा आदी उपस्थित होते.