नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे मोठ्या संख्येने लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. आता हळुहळू बाजार पूर्वपदावर येत आहे. अशा स्थितीत कंपन्यांकडून पुन्हा कर्मचारी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मॅनपॉवर ग्रुपने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार मार्चपासून ते जून अखेरपर्यंत बहुसंख्य कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत. विविध २३७५ कंपन्यांशी चर्चा करून हा सर्व्हे तयार करण्यात आला आहे.
मॅनपॉवर ग्रुपचे कार्यकारी संचालक संदीप गुलाटी यांच्या म्हणण्यानुसार, नव्या अर्थसंकल्पाचा परिणामही नोकऱ्यांवर दिसून येत आहे. सरकारने जे उपाय केले आहेत, त्यांचा परिणाम वर्षअखेरीस दिसेल. तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत नोकरीच्या क्षेत्रात अधिक संधी असेल.
होलसेल आणि रिटेल सेक्टरमध्ये नोकरीच्या फारशा अपेक्षा नाहीत. या क्षेत्रात फारतर २ टक्क्यांपर्यंतच कर्मचारी भरती होईल. बांधकाम क्षेत्राकडे पाहिले तर रिटेल सेक्टरकडून अधिक अपेक्षा ठेवता येणे शक्य आहे. येथे ५ टक्के कर्मचारी भरती होईल असे सर्व्हेत दिसून आले आहे. तर सर्व्हिस सेक्टरमध्ये सर्वाधिक ९ टक्के भरती होईल असे दिसून येते.
अनेक मोठ्या कंपन्या बाजाराची स्थिती आणखी मजबूत होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. काही कंपन्या आणखी काही महिने कर्मचारी भरती करणार नाहीत असेही सर्व्हेत आढळले आहे.