या वर्षी भारतीय अन्न सुरक्षा संकटात येवू शकते. वाढते तापमान हे याचे कारण असून यामुळे उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार आणि गुजरात यांसारख्या गहू उत्पादक देशांसाठी धोक्याची घंटा आहे. गव्हाच्या पिकावर तापमान सामान्य प्रमाणापेक्षा अधिक असल्याने परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी २०२३ हा महिना १९०१ नंतर सर्वाधिक तप्त होता. त्यामुळे शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. धोरण ठरविणारे घटक चिंतेत आहेत. कारण गव्हाचे उत्पादन घटले तर सार्वजनिक वितरण प्रणाली, अन्न महागाई आणि देशाच्या आर्थिक बजेटवर परिणाम होईल.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि चीनमधील विद्यापीठातील संशोधकांच्या म्हणण्यानुसार एक डिग्री सेल्सिअस तापमान वाढ झाल्यास गव्हाच्या उत्पादनात ६ टक्के घट होऊ शकते. २०२२-२३ मध्ये रब्बी हंगामात गव्हाचे अनुमानीत उत्पादन ११२८ लाख टन होते. २०२१-२२ मध्ये अनुमानीत उत्पाजन १११३.२ लाख टन उत्पादन अपेक्षित असताना त्यात नंतर सुधारणा करून ते १०७७.४ लाख टनावर आणण्यात आले. यंदा एक महिना आधीच तापमानवाढ झाली आहे. यंदा देशात गहू लागवड क्षेत्र १.३ लाख हेक्टरने वाढले आहे. मात्र उन्हाने वाढत्या उत्पादनाच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे. कर्नाल येथील भारतीय गहू आणि जवस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. जी. पी. सिंह यांनी सांगितले की, सातत्याने वाढत्या तापमानाबाबत चिंतेत असलेल्या संशोधकांनी उष्णता कमी करण्याच्या उपायांवर चर्चेसाठी बैठक घेतली आहे.