पुणे : राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कमी वेळेत पक्व होणाऱ्या उसाच्या ‘अतुल्य’ या नव्या वाणाची शिफारस केली आहे. या उसाची लागवड शेतकरी, साखर कारखान्यांना फायदेशीर ठरेल, असा दावा विद्यापीठाने केला आहे. शेतकऱ्यांनी आगामी कालावधीत मध्यम पक्व होणाऱ्या आणि लवकर पक्व होणाऱ्या ऊस जातींची लागवड करून कमी दिवसात जास्त ऊस उत्पदनाकडे लक्ष देणे गरजेचे ठरेल. त्यासाठी नव्या वाणांच्या निर्मितीकडे भर देण्यात आला आहे.
‘शुगर टूडे’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कृषी विद्यापीठाने लवकर पक्व होणारे उसाचे बियाणे को. ११०१५ (अतुल्य) ची राहुरी येथे मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. याचे बियाणे सध्या उपलब्ध आहे. मराठवाड्यातील गरजू शेतकऱ्यांनी या ऊस प्रजातीची जास्तीत जास्त लागवड करावी, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे. कोसी ६७१ आणि को ८६०११ या प्रजातीच्या संकरातून हे बियाणे विकसित करण्यात आले आहे. याचे उत्पादन प्रती हेक्टर १३५.७० टन प्रती हेक्टर असून साखर उत्पादन प्रती हेक्टर २०.०९ टन आहे. ऊस प्रजनन संस्था कोईमतूर येथे हे ऊस वाण विकसित करण्यात आले आहे. हा ऊस रसाच्या गुणवत्तेमध्ये ८६०३२ आणि कोसी ६७१ या प्रजातीपेक्षा सरस आहे. वाणाचा खोडवादेखील चांगला असून सुरू हंगामाचा पक्वता कालावधी ८ ते १२ आहे. रसाची गुणवत्ता १२ महिन्यांपर्यंत सुधारली जाते.