सहारनपूर : ऊस बिलांच्या थकबाकीबाबत राष्ट्रीय शेतकरी कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बजाज हिंदुस्तान शुगर मिल गांगनौलीच्या प्रवेशद्वारावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. जोपर्यंत कारखान्याकडून थकीत २०० कोटी रुपये मिळणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. सकाळी घोषणाबाजी करत राष्ट्रीय शेतकरी कामगार संघटनेशी संलग्न शेतकरी गांगनौली येथील साखर कारखान्यासमोर पोहोचले. तेथे त्यांनी प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, संघटनेचे जिल्हाध्यक्ष चौधरी सुखबीर सिंह यांनी सांगितले की, साखर कारखान्याने थकीत ऊस बिले दिलेली नाहीत. शेतकऱ्यांच्या उसाचा दरही जाहीर केलेला नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक केली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या विस्कळीत झाले आहेत. प्रशासन थकबाकी देण्यात अपयशी ठरले आहे. चौधरी कंवरपाल सिंह आणि लोकेश राणा यांनी सरकार शेतकऱ्यांचे शोषण करीत असल्याचे सांगितले. धरणे आंदोलनात जितेंद्र चौधरी, तेल्लू राम सैनी, नवीन त्यागी, चौधरी नवाब सिंह, निशू, सागर सैनी, बृजेश कुमार, सुधीर सैनी, सुरेंद्र यादव आदी शेतकरी उपस्थित होते.