नवी दिल्ली : भारताने निश्चित केलेल्या मुदतीपूर्वी पाच महिने आधी, पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबीत्व कमी करण्यासाठी २०२५-२६ पर्यंत हे उद्दीष्ट दुप्पट करण्यात येणार आहे. ऊस आणि अन्य कृषी उत्पादनांपासून इथएनॉल १० टक्के मिसळण्याचे टार्गेट नोव्हेंबर २०२२ पर्यंत होते. मात्र, हे जूनमध्येच पूर्ण झाले आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल) आणि हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे (एचपीसीएल) मोठे योगदान आहे. सरकारच्या अधिकृत निवेदनानुसार, सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रयत्नांमुळे १० टक्के मिश्रणाचे उद्दीष्ट मुदतीआधीच पूर्ण झाले आहे. मार्केटिंग कंपन्या देशभरात पेट्रोलमध्ये सरासरी १० टक्के इथेनॉल मिश्रण करीत आहेत.
याबाबत, न्यूज१८हिंदी डॉट कॉमवरील वृत्तानुसार, सरकारच्या दावा केला आहे की, यामुळे ४१,५०० कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत झाली आहे. याशिवाय ग्रीनहाऊस गॅसच्या उत्सर्जनात २७ लाख टनाची घट झाली आहे. शेतकऱ्यांना ४०,६०० कोटी रुपयांहून अधिक रक्कमेची बिले तत्काळ मिळाली आहेत. भारत सरकारच्या ऊर्जा सुरक्षा वाढविण्यासाठी, इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, परकीय चलनात बचत, पर्यावरणीय मुद्दे, देशांतर्गत शेती क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी ईबीपी कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले जात आहे. भारत हा अमेरिका, ब्राझील, युरोपीय संघ आणि चीननंतर जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात भारताने १० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या उद्दीष्टपूर्तीचा उल्लेख केला होता.