रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्धाची शक्यता वाढल्याने कीव येथील भारतीय दुतावासाने खास करून विद्यार्थ्यांना देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. युक्रेनची राजधानी कीव येथील भारतीय दुतावासाने मंगळवारी हे निर्देश दिले आहेत. दुतावासाने म्हटले आहे की, सध्याचे अनिश्चिततापूर्ण वातावरण पाहता खास करुन विद्यार्थ्यांनी येथे राहण्याची गरज नाही. त्यांनी तात्पुरत्या रुपात देश सोडावा.
भारतीय दुतावासाने सर्व भारतीयांना युक्रेनमधील प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कीव दुतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे. दुतावासाचे काम नियमीत रुपात सुरू राहील. युक्रेनमधील भारतीय नागरिकांना योग्य त्या सेवा सुरु राहतील असे सांगण्यात आले आहे. यापूर्वी २६ जानेवारी रोजी भारतीय दुतावासाने युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. गेल्या महिन्यात युक्रेनबाबत तणाव वाढला आहे. रशिया आणि नाटोने रशिया-युक्रेन सीमेवर परस्परांनी सैन्य मोठ्या प्रमाणात जमवल्याचे म्हटले होते. अमेरिका आणि युक्रेनने रशियावर आक्रमणाची तयारी सुरू असल्याचा आरोप केला होता. मात्र, मास्कोने हे आरोप फेटाळले होते. तणाव घटविण्यासआठी भारतासह कोणत्याही देशाने मदत करावी असे आवाहन अमेरिकेने केले आहे.