युक्रेन विरोधात युद्ध सुरू असल्याने रशियाच्या कच्च्या तेलावर प्राइज कॅप लावण्यास युरोपियन संघाने अस्थायी रुपात सहमती दिली आहे. युरोपीयन संघाच्या सरकारांनी रशियाच्या तेलावर ६० डॉलर प्रती बॅरलच्या प्राइस कॅपला मंजुरी दिली आहे. त्यामुळे रशिया या दरापेक्षा जादा किमतीने दुसऱ्या देशांना तेल विक्री करू शकणार नाही. युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. आता तेलावर प्राइज कॅप लावून रशियाला कमजोर करण्यास सुरुवात झाली आहे. रशिया तेल निर्यात करून पैसे उभारत आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, सप्टेंबर २०२२ पर्यंत रशियाने आपल्या तेलाची ब्रेंट क्रूडच्या तुलनेत २० डॉलर प्रती बॅरल स्वस्त दराने विक्री केली. भारताने गेल्या सहा महिन्यांपासून स्वस्त दराने रशियाकडून तेल मिळवले आहे. मात्र, आता ६० डॉलरची प्राइज कॅप लागू झाल्यानंतर भारताला अडचणीला सामोरे जावे लागेल अशी शक्यता आहे. सद्यस्थितीत भारताला रशियाकडून सवलतीच्या दराने तेल मिळत आहे. सध्या भारत ६० ते ७० डॉलर प्रती बॅरल दराने तेल घेत आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे अमेरिकेला आवडलेले नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी याबाबत टीकाही केली. मात्र भारताने आपला निर्णय मागे घेतलेला नाही. आता मात्र नव्या निर्णयाचा परिणाम भारतावर जाणवू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.