जागतिक स्तरावरील आर्थिक अनिश्चिततेच्या काळात भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेतील एक आशेचा तेजस्वी किरण आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी आज सांगितले. मुंबईत भरलेल्या 21 व्या जागतिक लेखापाल परिषदेला ते संबोधित करत होते.
जगात अस्थिरता, अनिश्चितता, गुंतागुंत, संदिग्धता असली तरीही, आपल्या देशाकडे आर्थिक सुधारणेसाठी आवश्यक नेतृत्व, क्षमता आणि कौशल्य आहे, हे भारताने दाखवून दिले आहे, असे वाणिज्य मंत्री म्हणाले. “कोरोना साथीच्या संकटातही भारतीय अर्थव्यवस्थेला तगवण्यासाठी, आर्थिक मूलभूत गोष्टींवर मोठ्या प्रमाणावर भर देत अतिशय रास्त उपाययोजना करण्यात आल्या. आमचे सरकार समाजातील सर्व घटकांच्या सर्वसमावेशक कल्याणावर लक्ष केंद्रित करते,”असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय वाणिज्य मंत्री म्हणाले की, विकासाला चालना देण्यासाठी आणि संकटातून मार्ग काढण्यासाठी, जग आज भारतीय अर्थव्यवस्थेचा आदर्श समोर ठेवत आहे. “जगाने भारताची भक्कम आर्थिक मूलभूत तत्त्वे, मनुष्यबळातून मिळणारे लाभ, दुसरीकडे कुठेही सहसा न मिळणारा मात्र भारतात मिळणारा ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद, आणि भारतातील तरुणाईची कौशल्ये तसेच व्यवस्थापन क्षमता ओळखल्या आहेत आणि मान्यही केल्या आहेत”, असेही पियुष गोयल यांनी सांगितले.
जी-20 समुहाच्या अध्यक्षपदासाठी आपली संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकम’ अशी आहे, असे जी -20 समुहाच्या अध्यक्षपदाबद्दल बोलताना वाणिज्य मंत्री म्हणाले. “संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, यावर भारताचा विश्वास आहे. भारताला संपूर्ण जगाची काळजी आहे आणि त्याच अनुषंगाने आपण आपल्या अध्यक्षपदाची संकल्पना, एक पृथ्वी-एक कुटुंब-एक भवितव्य अशी ठेवली आहे. जग उपभोगावर आधारीत ,म्हणजेच वापर वाढवून आर्थिक वृद्धी साधण्यावर विश्वास ठेवतानाच भारत निसर्गाचा आदर राखत शाश्वततेवर लक्ष केंद्रीत करतो”, असे गोयल यांनी सांगितले.
भारत हा आंतरपिढीय समानतेवर विश्वास ठेवतो आणि आपल्याला वारसा रूपाने लाभलेल्या ग्रहापेक्षा चांगला ग्रह आपण मागे ठेवून जाणं हे इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
आपण भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या आणि प्रत्येक भारतीयापर्यंत समृद्धी पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहोत असं केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं. आपण भारतीय स्वातंत्र्याची शंभर वर्ष साजरी करत असताना भारताकडे विकसित राष्ट्र म्हणून पाहता येईल अशा भविष्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेनं कल्पना केली आहे असं ते म्हणाले.
वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाउंटंट्समध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स अर्थात सनदी लेखापालांच्या या संमेलनाला संबोधन करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की सनदी लेखापाल हे या दृष्टिकोनाचे रक्षणकर्ते आहेत. सनदी लेखापालांनी या मोहिमेच्या प्रगतीचं प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला खात्री पटवता येईल की देशवासीयांना दिलेली वचनं आणि मान्य केलेल्या बाबींची अंमलबजावणी केली जात आहे. आपण सत्य आणि वस्तुनिष्ठ चित्राचं प्रमाणीकरण करतो असं त्यांनी सांगितलं.
जागतिक अर्थव्यवस्था पुनर्जीवित करत असताना जेव्हा आपण पाहतो की जग उत्तम ऊर्जा सुरक्षा, अन्नसुरक्षेच्या दृष्टीने तयार होत आहे, भविष्यात नवोन्मेष आणि तंत्रज्ञान हे विकासाला चालना देण्यात महत्वपूर्ण ठरतील जे ओळखून सनदी लेखापाल या नात्यानं सरकार आणि संस्थांसोबत एकत्र मिळून काम करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे असं ते पुढे म्हणाले.
भारतीय सनदी लेखापाल संस्थेन 21 व्या जागतिक लेखापाल परिषद 2022 चं आयोजन मुंबईत हायब्रीड पद्धतीनं केलं आहे. ‘विश्वासाधारित शाश्वतता बांधणी’ ही जागतिक लेखापाल परिषद 2022 ची संकल्पना आहे.
(Source: PIB)