नवी दिल्ली : चीनी मंडी
भारतातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना अनुदान दिल्याने नाकाला मिरच्या झोंबलेल्या ऑस्ट्रेलिया सरकारने अखेर जागतिक व्यापार संघटनेत (डब्ल्यूटीओ) भारताची रितसर तक्रार केली आहे. भारताने प्रमाणाबाहेर अनुदान दिल्याचे ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनेही ही माहिती दिली आहे.
ऑस्ट्रेलियाने केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, गेल्या सहा वर्षांत भारतात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात दहा पट वाढ झाली आहे.
भारत सरकाराने ऊस उत्पादकांना एकूण उत्पादनाच्या दहा टक्के मदत किंवा अनुदान देणे अपेक्षित आहे. पण, २०११ पासून भारत सरकारची मदत ७७.१ टक्क्यांपासून ९९.८ टक्क्यांपर्यंत गेली आहे. भारताने ९३० कोटींपासून ११ हजार ८०० कोटी रुपयांपर्यंत अनुदानरुपातून पैसे दिले आहेत.
अनुदानामुळे भारतात ऊस आणि साखर उत्पादन वाढत आहे. त्यामुळे पुरवठा वाढत असून, आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर घसरत आहेत. परिणामी ऑस्ट्रेलियातील उत्पादकांचेही नुकसान होत आहे, असा आरोप ऑस्ट्रेलियाने केला आहे. रताविरोधात जागतिक व्यापार संघटनेत कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
गेल्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियाने सातत्याने थेट भारतापुढे हा मुद्दा उपस्थित होता. आता हा विषय जागतिक व्यापार संघटनेपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे यावर विशेष चर्चा होणार आहे. नोव्हेंबर अखेरीस जागतिक व्यापार संघटनेच्या कृषी समितीची बैठक होणार आहे. त्यात हा विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे.