नवी दिल्ली : ऑक्टोबर २०२५ मध्ये सुरू होणाऱ्या पुढील गाळप हंगामाच्या सुरुवातीला भारतात पुरेसा साखर साठा असेल, असे इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (इस्मा)चे महासंचालक दीपक बल्लानी यांनी एएनआयला सांगितले. एका टेलिफोन मुलाखतीत बल्लानी म्हणाले की, पुढील हंगामासाठी भारतात सुरुवातीच्या साठ्यात सुमारे ६० लाख टन साखर उपलब्ध असेल. तर मानक साठ्याचे प्रमाण ५०-५५ लाख टन आहे.
बल्लानी यांच्या मते, २०२४-२५ हंगामासाठी सुरुवातीचा साठा ८० लाख टन होता. २०२४-२५ साठी साखर उत्पादनाचा अंदाज २७२ लाख टन आहे. हंगाम २०२३-२४ मध्ये उत्पादित झालेल्या ३२० लाख टनांपेक्षा हे उत्पादन सुमारे १५ टक्के कमी असेल. ८० लाख टनांचा सुरुवातीचा साठा आणि २७२ लाख टन उत्पादनाचा अंदाज असल्याने, २०२४-२५ मध्ये एकूण साखर उपलब्धता ३५२ लाख टन असेल. भारतात दरवर्षी सुमारे २८० लाख टन साखर वापरली जाते. त्यामुळे पुढील हंगामासाठी सुमारे ६० लाख टन साखरेचा साठा सुरुवातीच्या काळात उपलब्ध होईल.
केंद्र सरकारने हंगाम २०२३-२४ मध्ये साखर व्यापारावर निर्बंध घालल्यानंतर यावर्षी, २१ जानेवारी रोजी साखर उत्पादकांना १० लाख टन साखर निर्यात करण्याची परवानगी दिली. देशांतर्गत बाजारपेठेत किंमत स्थिरता राखण्यासाठी सरकारने गेल्यावर्षी साखर निर्यातीवर निर्बंध घातले होते. बल्लानी यांनी सांगितले की, आता १० लाख टन निर्यात केल्यानंतरही, भारत हंगाम ६० लाख टनांवर संपवेल. सरकारला साधारणपणे, ५०-५५ लाख टन सामान्य साठा म्हणून ठेवायचा असतो. निर्यातीला परवानगी दिल्यानंतरही, आपल्याकडे अजून जास्त क्लोजिंग स्टॉक असेल. म्हणूनच सरकारने निर्यातीला परवानगी दिली आहे. भौतिक आणि करारानुसार, आम्ही आधीच सुमारे ६ लाख टन ते ७ लाख टन निर्यात केली आहे, असे बल्लानी म्हणाले.
मुलाखतीदरम्यान, इस्माच्या महासंचालकांनी भारतातील साखरेच्या किमतींबद्दल आणि ते योग्य किमत वाढीच्या गतीपेक्षा कसे मागे आहेत याबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, आमच्याकडे सप्टेंबरपर्यंत वेळ आहे आणि मला वाटते की पुढील दोन महिन्यांत आम्ही आमचा १० लाख निर्यात कोटा पूर्ण करू. सध्या महाराष्ट्रात साखरेचा एक्स-मिल भाव ३,८०० रुपये प्रति क्विंटल आणि उत्तर प्रदेशात ४,०००-४,०५० रुपये प्रति क्विंटल आहे. बल्लानी यांना अपेक्षा आहे की नजीकच्या भविष्यात देशांतर्गत साखरेचा बाजार मजबूत राहील, आणि दर प्रति क्विंटल ४०००-४१०० रुपयांच्या आसपास राहतील.
बल्लानी यांच्या मते, गेल्या दोन वर्षांपासून साखरेचा सरासरी किरकोळ भाव जवळजवळ स्थिर राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत साखरेच्या किमान विक्री किंमतीत सुधारणा करण्यात आलेली नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. २०१९ मध्ये, साखर उत्पादनाचा अंदाजे खर्च ४१ रुपये असताना, तो ३१ रुपये प्रति किलो निश्चित करण्यात आला होता.
ते म्हणाले, आम्ही अजूनही उत्पादन खर्चापेक्षा खालच्या स्तरावर आहोत. शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी, गुंतवणुकीसाठी आणि आपला उद्योग टिकून राहण्यासाठी आपल्याला साखरेचा योग्य भाव हवा आहे. त्यांनी असा युक्तिवाद केला की भारत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जगात सर्वाधिक दर देतो, परंतु अंतिम उत्पादनासाठी – साखरेसाठी – सर्वात कमी दर मिळतो.