भारताने संयुक्त अरब अमीरातसोबत (यूएई) झालेल्या बैठकीत कृषी क्षेत्र आणि तांदूळ निर्यातीमधील समस्यांचे मुद्दे उपस्थित केले. भारत-यूएई परिषदेचे अध्यक्ष, खासदार आणि भारत-यूएई संयुक्त कार्यगटाचे सदस्य एस. विक्रमजित सिंह यांनी यूएईचे परराष्ट्र व्यापार राज्यमंत्री डॉ. थानी बिन अहमद अल जेयूदी यांची भेट घेतली. या दौऱ्यात द्विपक्षीय सहयोगाच्या अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. सिंह यांनी सांगितले की, दोन्ही देशांदरम्यान करण्यात आलेल्या द्विपक्षीय करारामुळे व्यापार नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. दोन्ही देशांमधील चर्चा व्यापक आणि आर्थिक सहयोग करारांतर्गत (सीईपीए) आणि मुक्त व्यापार करारांच्या (एफटीए) निष्कर्षानुसार झाली आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सिंह यांनी यावेळी भारतीय निर्यातदारांचा तांदूळ किटकनाशके असल्याचे कारण देऊन नाकारल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी दोन्ही देशांमधील स्वीकारार्ह मानके, लॅबची स्थापना, भारतातील फार्मास्युटिकल्स उत्पादनांच्या स्वीकृतीवर भर दिला. यूएईमध्ये किमान गुंतवणूक मर्यादा कमी करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली. सध्या ही मर्याता १० कोटी दिऱ्हम आहे. यूएई-भारत द्विपक्षीय गुंतवणुकीवर लवकर निर्णय घ्यावेत, दोन्ही देशातील संयुक्त उद्योगांवर सुव्यवस्थीत काम करण्यावर त्यांनी भर दिला. यूएईच्या मंत्र्यांनी भारतासोबत व्यापाराची स्थिती समाधानकारक असल्याचे सांगितले. भारतात गुंतवणुकीचे आश्वासन दिले.