नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर भारताला झटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) देशाच्या विकास दराच्या अनुमानात सुधारणा करताना पूर्वानुमानापेक्षा त्यात घट केली आहे. या जागतिक संस्थेने म्हटले आहे की, सध्याच्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ६ टक्क्यांपेक्षा कमी राहिल. आयएमएफने आपल्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूकमध्ये सध्याच्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ५.९ टक्के केला आहे. यापूर्वी हे अनुमान ६.१ टक्के इतके होते. दीर्घकाळ सुरू राहिलेले रशिया-युक्रेन युद्ध आणि कोरोना महामारीमुळे विकास दराच्या अनुमानात कपात करण्यात आली आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, आर्थिक घटकांचा जो परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे, त्यामुळे मध्य कालावधीत विकास दर कमजोर दिसून येत आहे. यापू्र्वी जागतिक बँकेने २०२३-२४ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा दर ६.३ टक्के आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेने ६.४ टक्के राहिल असे अनुमान वर्तवले होते. यादरम्यान आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने २०२३ साठीची जागतिक आर्थिक वाढीचे आपले अनुमान २.९ टक्क्यांनी घटवले आहे. दरम्यान, चीनचा विकास दर २०२३ मध्ये ५.२ टक्के राहिल आणि २०२४ मध्ये ४.५ टक्के राहिल असे अनुमान आहे. भारत आगामी दोन वर्षात सर्वात गतीने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे आयएमएफचे म्हणणे आहे.