नवी दिल्ली : भारत सरकारने शनिवारी गैर-बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवरील बंदी तात्काळ उठवली. परंतु परकीय व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) अधिसूचनेत म्हटले आहे की, यासाठी ४९० डॉलर प्रती टन किमान निर्यात किंमत (एमईपी) लागू केले जाईल. याबाबत DGFT ने अधिसूचनेत म्हटले आहे की, गैर बासमती पांढरा तांदूळ (अर्ध-मिल्ड किंवा पूर्ण मिल्ड तांदूळ) तो पॉलिश्ड नसला तरी HS कोड १००६ ३० ९० अंतर्गत त्याची निर्यात ४९० डॉलर या दराने केली जाईल. डीजीएफटीने ही अधिसूचना जारी केली आहे.
अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने निर्यात शुल्क शून्यावर आणल्यानंतर पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात आला आहे. सरकारने तुटलेल्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली, तेव्हा सप्टेंबर २०२२ पासून हे शुल्क लागू आहे. शुक्रवारी रात्री उशिरा महसूल विभागाने अधिसूचना जारी करून उकड्या तांदळावरील शुल्क २० टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणले. यावर प्रतिक्रिया देताना, भारतीय तांदूळ निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष बी. व्ही. कृष्णा राव म्हणाले, “पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याच्या आणि उकड्या तांदळाच्या निर्यातीवरील शुल्क कमी करण्याच्या निर्णयाचे व्यापारी समुदाय स्वागत करीत आहे. तथापि, उकड्या तांदळावर १० टक्के शुल्क आणि पांढऱ्या तांदळावर ४९० डॉलर प्रती टन एमईपी यामागील भूमिका समजलेली नाही.