चीनला मागे टाकून भारत बनला जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश : यूएन

न्युयॉर्क : संयुक्त राष्ट्र संघाकडील (यूएन) आंकडेवारीनुसार, चीनला मागे टाकून भारत आता जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे. संयुक्त राष्ट्र जागतिक लोकसंख्या डॅशबोर्डने सांगितले की, भारतात आता १४२८.६ मिलियन लोक आहेत तर चीनची लोकसंख्या १४२५.७ मिलियन आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने १९५० पासून लोकसंख्येचा डेटा जमा करण्यास सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदाच भारताने संयु्क्त राष्ट्रांच्या सर्वाधिक लोकसंख्येच्या देशांच्या यादीत अग्रस्थान पटकावले आहे.

एक वर्षापूर्वी चीनची लोकसंख्या १९६० नंतर पहिल्यांदा कमी झाली होती. २०१६ मध्ये बिजिंगने आपल्या कठोर एक मूल धोरण समाप्त केले आहे. १९८० च्या दशकात अधिकाधिक लोकसंख्येच्या भीतीमुळे हे धोरण लागू करण्यात आले होते. २०२१ मध्ये दाम्पत्यांना तीन मुलांना जन्म देण्याची मुभा देण्यात आली.

यादरम्यान, अमेरिका अनुमानीत ३४० मिलियनच्या लोकसंख्येसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने २०११ नंतर जनगणना केलेली नाही. त्यामुळे लोकसंख्येची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. भारतात २०२१ मध्ये जनगणना होणार होती. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे त्यास स्थगिती देण्यात आली. संयुक्त राष्ट्रांकडील आकडेवारीनुसार, २०२३ च्या मध्यापर्यंत जागतिक लोकसंख्या ८.०४५ अब्जापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here