अब्जाधिशांच्या यादीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली : फोर्ब्स मासिकाच्या ताज्या रिपोर्टनुसार जगात अमेरिका आणि चीननंतर सर्वाधिक अब्जाधिश भारतात आहेत. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी चीनचे उद्योजक जॅक मा यांना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे स्थान पुन्हा मिळवले आहे.

फोर्ब्सने जगातील अब्जाधिशांची ३५ वी वार्षिक यादी जाहीर केली आहे. अमेझॉनचे सीईओ आणि संस्थापक जेफ बेजोस सलग चौथ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहेत. बेजोस यांची संपत्ती १७७ अब्ज अमेरिकन डॉलर असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे. गेल्यावर्षी ही संपत्ती ६४ अब्ज अमेरिकन डॉलर होती.

अॅलन मस्क द्वितीय क्रमांकावर
यादीत स्पेसएक्सचे संस्थापक अॅलन मस्क द्वितीय क्रमांकावर आहेत. त्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. मस्क यांची संपत्ती गेल्यावर्षीपेक्षा १२६.४ अब्ज डॉलरने वाढून १५१ अब्ज डॉलर झाली आहे. गेल्यावर्षी ते २४.६ अब्ज डॉलर संपत्तीसह यादीत ३१ व्या क्रमांकावर होते. टेस्ला कंपनीच्या शेअर्समध्ये झालेली ७०५ पट वाढ हे यामागील कारण असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे.
मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी जागतिक अब्जाधिशांच्या यादीत १० व्या क्रमांकावर आहेत. त्यांनी ८४.५ अब्ज अमेरिकन डॉलर संपत्तीसह आशियातील सर्वात श्रमींत व्यक्तीचे स्थान परत मिळवले आहे. गेल्यावर्षी चीनचे जॅक मा पहिल्या क्रमांकावर होते. या यादीत जॅक मा हे गेल्यावर्षीच्या १७ व्या स्थानावरून घसरून २६ व्या क्रमांकावर गेले आहेत.

अदानी यांच्या संपत्तीत जोरदार वाढ
भारताील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी ५०.२ अब्ज अमेरिकन डॉलर संपत्तीसोबत अब्जाधिशांच्या यादीत २४ व्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानींपासून ते फक्त ४ क्रमांक दूर आहेत. गेल्यावर्षी त्यांच्या संपत्तीत जोरदार वाढ झाली आहे.

या भारतीयांचा आहे समावेश
पूनावाला समुहाचे चेअरमन आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस पुनावाला यादीत १६९ व्या क्रमांकावर आहेत. ते भारतीय अब्जाधिशांच्या यादीत सातव्या क्रमांकावर आहेत. एचसीएल टेक्नॉलॉजीचे संस्थापक शिव नाडर, भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. जागतिक स्तरावर ते ७१ व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती २३.५ अब्ज अमेरिकन डॉलर आहे.

अमेरिकेत सर्वाधिक अब्जाधिश
फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, जगात सर्वाधिक ७२४ अब्जाधिश अमेरिकेत आहेत. त्यानंतर चीनमध्ये ६९८ अब्जाधिश आहेत. तर भारतात १४० अब्जाधिश असून भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर जर्मनी आणि रशिया आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here