नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या ताज्या जागतिक आर्थिक आऊटलूकनुसार, 2024 मध्ये भारत ही प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल. IMF ने 2024 साठी भारताचा विकास अंदाज 6.5 टक्क्यांवरून 6.8 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. IMF ने 2025 साठी भारताचा विकास दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. IMF च्या मते, देशांतर्गत मजबूत मागणी आणि वाढत्या तरुण मनुष्यबळामुळे भारताची अर्थव्यवस्था चांगले प्रदर्शन करणार आहे.
IMF ने चीनचा विकास दर यावर्षी ४.६ टक्के आणि २०२५ मध्ये ४.१ टक्के राहण्याची शक्यता वर्तवली आहे.2000 पासून, अर्जेंटिना, ब्राझील, चीन, भारत, इंडोनेशिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि तुर्कस्तान या ग्रुप ऑफ ट्वेंटी (G20) च्या 10 उदयोन्मुख बाजारपेठांमधील आर्थिक वाढीने प्रगत अर्थव्यवस्थांना सातत्याने मागे टाकले आहे.
भारताच्या अधिकृत आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत देशाचा विकास दर 8.4 टक्के राहिला आणि देश सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहिली. एप्रिल-जून आणि जुलै-सप्टेंबर या दोन तिमाहींमध्ये भारतीय अर्थव्यवस्था अनुक्रमे 7.2 टक्के आणि 2021-22 मध्ये 8.7 टक्क्यांनी वाढली.
IMF ने 2024 आणि 2025 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था वाढ अनुक्रमे 3.2 टक्के दर्शवली आहे. IMF ने म्हटले आहे की, जगाने मंदी टाळली, बँकिंग प्रणाली मोठ्या प्रमाणात लवचिक ठरली आणि प्रमुख उदयोन्मुख बाजार अर्थव्यवस्थांना कुठल्याही व्यत्ययाचा सामना करावा लागलेला नाही. त्याचा परिणाम अर्थव्यवस्था वाढीवर झाला आहे.