नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. सरकारचा विकासाचा मंत्र “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करत होत्या.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या कि, आज देश जलद गतीने मोठे निर्णय घेताना पाहत आहे. या निर्णयांमध्ये महिला, युवक, मध्यमवर्गीय आणि शेतकरी यांना प्राधान्य दिले जात आहे. माझ्या सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे सर्वसामान्यांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. सरकारने या योजनेअंतर्गत आणखी ३ कोटी घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. माझे सरकार मध्यमवर्गीयांच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.आयुष्मान भारत योजनेअंतर्गत, ७० वर्षे आणि त्यावरील वयाच्या सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी त्यांना ५ लाख रुपयांचे आरोग्य कवच मिळेल,असे त्या म्हणाल्या. अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर केला जाईल. अर्थसंकल्पाच्या दिवशी, अर्थमंत्री सकाळी ११ वाजता लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पीय भाषणात सरकारची राजकोषीय धोरणे, महसूल आणि खर्चाचे प्रस्ताव, कर सुधारणा आणि इतर महत्त्वाच्या घोषणांची रूपरेषा असेल.