हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
कानपूर : भारतात पारंपरिक पद्धतीने ऊसापासून साखर तयार केली जाते. पण, आता बिटापासून साखर तयार करण्याचा विचार भारतातही केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी जेष्ठ नेते आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी देखील बिटापासून साखर तयार करण्याला अनुकूलता दाखवली होती. या संदर्भात राष्ट्रीय साखर संस्थेतील (एनएसआय) शास्त्रज्ञ काम करत असून, बिटापासून साखर तयार करण्याचे तंत्रज्ञान अवगत करून घेण्यासाठी इजिप्तचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात दोन तंत्रज्ञानांची देवाण-घेवाण होणार आहे. भारताकडून इजिप्तच्या शास्त्रज्ञांना उसापासून साखर तयार करण्याचे तंत्रज्ञान दिले जाईल, तर इजिप्तकडून भारताला बिटापासून साखर तयार करण्याचे तंत्रज्ञान दिले जणार आहे. इजिप्तबरोबर नायजेरिया आणि श्रीलंकेशीही राष्ट्रीय साखर संस्थेचा सामंजस्य करार होण्याच्या मार्गावर आहे.
या संदर्भात राष्ट्रीय साखर संस्थेतील शास्त्रज्ञ प्रा. नरेंद्र मोहन यांनी सांगितले की, संस्थेच्या शास्त्रज्ञांची एक टीम बिटापासून साखर तयार करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान शिकणार आहे. बीट थंड प्रदेशात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे देशात सगळीकडे बिटाची शेती अशक्य आहे. पण, प्रयोग केला जाऊ शकतो. बिटाचे उत्पादन पाच महिन्यांमध्ये घेता येऊ शकते. त्याची लागवड नोव्हेंबर महिन्यात करून वर्षातून दोन वेळा उत्पादन घेता येणे शक्य आहे. ऊस दहा महिन्यांचे पिक आहे. त्याच्या तुलनेत बिटाचे उत्पादन २० टक्के जास्त होत असल्याने शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल. राष्ट्रीय साखर संस्था नायजेरिया आणि श्रीलंकेतील साखर उद्योगाला हातभार लावणार आहे. सध्या दोन्ही देशांत साखर उद्योग अडचणीत आहे. नायजेरियामध्ये साखर संस्था सुरू करायची असून, तेथे शिक्षकांची भरतीही केली जाणार आहे.