अन्न सुरक्षेबाबतीत भारताने मोठे काम केले आहे आणि आता भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार बनला आहे, असे मत अमेरिकेतील वरिष्ठ राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. फिजीमध्ये आयोजित यूएस इंडो पॅसिफिक कमांड चीफ ऑफ डिफेन्स परिषदेदरम्यान, यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटच्या प्रशासक समंथा पॉवर यांनी भारताने अमेरिकेची मदत घेतल्यानंतर अन्न सुरक्षेबाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा मोठा पल्ला गाठला आहे, असे म्हटले आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सामंथा पॉवर यांनी भारताचे कौतुक केले.एका देशात केलेल्या गुंतवणुकीचा फायदा इतर देशांनाही होतो, असे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, अन्न सुरक्षेबाबत, भारतात १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला आम्ही वैज्ञानिक आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या सहकार्याने उच्च उत्पादन देणारे बियाणे विकसित आणि वितरित केले. पुढील दोन दशकांत, त्या बियाण्यांच्या मदतीने भारताने तांदूळ उत्पादनात ५० टक्के आणि गव्हाचे उत्पादन २३० टक्क्यांनी वाढवले. भारतात हरितक्रांती झाली आणि या वाढलेल्या कृषी उत्पादनाचा फायदा जगातील इतर देशांनाही झाला.
सामंथा पॉवर म्हणाल्या की, भारत आज जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. जागतिक तांदूळ व्यापारात भारताचा वाटा ४० टक्के आहे. २०२२ मध्ये, भारताने १४० देशांना ९.६६ अब्ज अमेरिकन डॉलर किमतीचा २२ दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला.
दरम्यान, देशांतर्गत तांदळाच्या किमती नियंत्रणासाठी भारत सरकारने २० जुलै रोजी गैर बासमती तांदूळ निर्यातीवर बंदी घातली आहे.