नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात २०४७ पर्यंत देशाला विकसित बनविण्याचे लक्ष्य निश्चित केले. हे उद्दिष्ट लक्षात घेतले तर या कालावधीपर्यंत भारतीयांचे उत्पन्न अनेक पटीने वाढेल. भारताला या यशोशिखरावर नेण्यासाठी अर्थ मंत्रालय आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने एकत्र काम करण्याचे ठरवले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार सध्या भारतीयांचे दरडोई उत्पन्न २२७७.४ डॉलर आहे. या आधारावर भारत जागतिक बँकेच्या निकषात निम्न मध्यम उत्पन्न असलेला देश आहे.
आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, विकसित देशात प्रती व्यक्ती उत्पन्न किमान १२ हजार डॉलर असते. दरडोई उत्पन्नात लक्झमबर्ग पहिल्या क्रमांकावर आहे. तेथे प्रती व्यक्ती वार्षिक उत्पन्न १,३५,६८२.८ डॉलर आहे. त्यापाठोपाठ अमेरिकेत दरडोई उत्पन्न ६९,२८७.५ डॉलर आहे. त्यानंतर सिंगापूर, ब्रिटन, जपानचा नंबर लागतो. विकसित देश विकसनशील देशांपेक्षा मानव सूचकांकामध्ये अग्रेसर असतात. या देशांतील औद्योगिकरणामुळे शेतीवरील अवलंबित्व कमी होते. यात नॉर्वे अव्वल आहे. भारत मानव सूचकांकामध्ये १३१ व्या क्रमांकावर आहे. याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, विकसित देशाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी डिजिटलीकरण, शिक्षण आणि पायाभूत सुविधा या तीन गोष्टींवर भर देण्यात येत आहे. योजना आयोगाचे माजी उपाध्यक्ष मॉंटेक सिंह अहलुवालिया यांच्या म्हणण्यानुसार, २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्यासाठी देशाचा वार्षिक विकास दर ८ टक्के राहणे गरजेचा आहे.