नवी दिल्ली : भारत २०२६ पर्यंत अमेरिका आणि ब्राझीलनंतर जगातील इथेनॉल उत्पादनातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ बनले असे आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे. अहवालात म्हटले आहे की, देशात २०१७ आणि २०२१ या कालावधीत इथेनॉलची मागणी तीन अब्ज लिटर होण्याचे अनुमान आहे. भारतातील वाढत्या मागणीमुळे उत्साहित आशिया २०२६ पर्यंत जैव इंधनाच्या उत्पादनात युरोपला मागे टाकेल अशी शक्यता आहे.
सरकारी धोरणांना इथेनॉल विस्तारीकरणाच्या प्रमुख रुपात पाहिले जात आहे. इथेनॉलची बाजारपेठ वाढल्याने एकूण वाहतूक इंधनाची मागणी, किंमत, नवे धोरण यात महत्त्वपूर्ण बदल होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून महिन्यात इथेनॉलसंबंधी महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या. सराकरने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याची घोषणा त्यांनी केली. यापूर्वी हे उद्दीष्ट २०३० पर्यंत पूर्ण केले जाणार होते.
सरकारने इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सकारात्मक पावले उचलली आहेत. अलिकडेच सरकारने इथेनॉलचा दर ६२.६५ रुपयांवरून वाढवून ६३.४५ रुपये प्रती लिटर केला आहे. सी हेवी मोलॅसीसपासून इथेनॉलचा दर सध्या ४५.६९ रुपये प्रती लिटर होता. तो आता ४६.६६ रुपये प्रती लिटर केला आहे. तर बी हेवी मोलॅसेसीसपासून इथेनॉलचा दर ५७.६१ रुपये प्रती लिटरवरुन वाढवून ५९.०८ रुपये प्रती लिटर करण्यात आला आहे.