भूतानचे आर्थिक व्यवहार मंत्री लोकनाथ शर्मा यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली. भारताने भूतानला कृषी क्षेत्रात सर्वतोपरी सहकार्य केले असून यापुढेही हे सहकार्य कायम राहील असे तोमर यांनी या बैठकीत सांगितले.
भूतानच्या शिष्टमंडळाचे स्वागत करताना तोमर यांनी दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंधांबद्दल आनंद व्यक्त केला आणि ते म्हणाले की पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेला भूतान हा पहिला देश होता, यामधून आपले मजबूत संबंध अधोरेखित होत आहेत.
“ही मैत्री वाढावी यासाठी भारत सहकार्य करत आहे. दोन्ही देशांमधील व्यापारी भागीदारी देखील मजबूत झाली आहे आणि आपले संबंध आणखी दृढ व्हावेत यासाठी भारत अनुकूल आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि अन्य मंत्रालये भूतान बाबत भरीव निर्णय घेत आहेत. भूतानमधील विविध कृषी उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठ खुली करण्यावर देखील आम्ही काम करत आहोत. भूतानच्या विनंतीवरून भूतानला भारतामध्ये आले निर्यातीला तसेच आणखी एक वर्ष बटाट्याची निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे,“ तोमर म्हणाले.
दोन्ही देश कृषी क्षेत्रात एकत्र काम करत राहतील तसेच अंतर्गत आणि बाह्य परिस्थिती लक्षात घेऊन भूतानच्या विनंतीबाबत आवश्यक असेल त्या वेळी आम्ही सकारात्मक दृष्टीकोन ठेवू असे आश्वासन त्यांनी दिले.
भूतानचे मंत्री शर्मा यांनी भूतानला केल्या जाणाऱ्या साखरेच्या पुरवठ्यासह विविध बाबींमध्ये भारताने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. शेतीबाबतचे प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे असून दोन्ही देशांमधील मैत्री आणखी वाढावी यासाठी आपण भारतात आल्याचे ते म्हणाले.
(Source: PIB)