साखर क्षेत्राशी संबंधित आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था परिषद बैठक या जागतिक पातळीवरील कार्यक्रमाचे यजमानपद यंदा भारताकडे आहे. नवी दिल्ली इथे उद्या म्हणजेच 25 जून 2024 पासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. येत्या 27 जून पर्यंत हा कार्यक्रम सुरु राहील. या कार्यक्रमात साखर आणि जैवइंधन क्षेत्रातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. त्यासाठी जगभरातील 30 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी तसेच अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
भारत हा साखरेचा जगातील सर्वात मोठा ग्राहक आणि दुसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्था परिषदेने 2024 या वर्षासाठी संघटनेचे अध्यक्ष म्हणून भारताचे नाव प्रस्तावित केले होते. या बैठकीचा एक भाग म्हणून, 24 जून 2024 रोजी या कार्यक्रमासाठी आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींची उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील एका धान्य – आधारित डिस्टिलरीमध्ये औद्योगिक भेट घडवून आणली जाणार आहे. यासोबतच संबंधित विविध उपक्रमांची सुरुवात देखील केली जाणार आहे. या माध्यमातून भारताने जैवइंधन आणि संबंधित इतर पुरक आणि उप उत्पादनांच्या उत्पादन प्रक्रियेत अवलंब केलेलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाचे दर्शन जगभरातील प्रतिनिधींना घडवले जाणार आहे.
25 जून 2024 रोजी भारत मंडपम इथे ‘साखर आणि जैवइंधन – उदयोन्मुख परिक्षेत्र’ या कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे.
या कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, भारतीय साखर कारखान्यांमधील वरिष्ठ व्यवस्थापनांचे प्रतिनिधी, भारतीय साखर उद्योग संघटना तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघ मर्यादित यांसारख्या उद्योग संघटना तसेच या क्षेत्राशी संबंधित तांत्रिक तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. जगभरातील विविध देशांमधून तसेच विविध संस्थांचे 200 पेक्षा जास्त प्रतिनिधी या मंचावर एकत्रित येणार आहेत. या सगळ्यांना जागतिक साखर क्षेत्र, जैवइंधन, शाश्वतता आणि शेतकऱ्यांची भूमिका याबाबत जागतिक पटलावरील भविष्यवेधी दृष्टीकोनावर व्यापक चर्चा करण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. बहुतांश देश हे आंतरराष्ट्रीय मानकिकरण संस्था तसेच जागतिक जैवइंधन आघाडीचे देखील सदस्य आहेत . त्यामुळे आता या सगळ्यांना आपल्या आघाडीचा विस्तार करण्यासाठी तसेच जैवइंधनाच्या प्रचार प्रसारासाठी नवा मंच उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमांच्या मालिकेअंतर्गत 26 जून 2024 आणि 27 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय मानकिकरण संस्थेच्या विविध समित्यांच्या बैठका होतील. या बैठकांमध्ये प्रामुख्याने संघटनेच्या विविध प्रशासकीय आणि कार्यात्मक पैलूंवर चर्चा केली जाणार आहे.
(Source: PIB)