नवी दिल्ली : कोरोना महामारीनंतर कंटेनरची कमतरता हे निर्यातीला उशीर होण्याचे मुख्य कारण बनले आहे. भारताने निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सरकारच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत कंटेनर उत्पादनाचा विचार सुरू आहे.
देशात उत्पादन झालेल्या वस्तूंच्या निर्यातीसाठी कंटेनर आवश्यक आहेत. सद्यस्थितीत भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडियावर निर्यात अवलंबून आहे. बंदर, जहाज आणि सागरी वाहतूक मंत्रालयाने गुजरामधील भावनगर येथे कंटेनर निर्मितीची गरज तपासण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. याशिवाय अन्य हबवरही पर्याय शोधले जात आहेत.
आतापर्यंत बहूतांश निर्यातदार मुख्यतः चीनच्या कंटेनरवर अवलंबून असतात. मात्र, सध्या गतीने बदललेल्या राजकीय परिस्थितीत कंटेनरच्या तुटवड्याने निर्यातीला फटका बसत आहे. त्यामुळे मालाच्या वाहतूक खर्चात वाढ होत आहे. राजकीय तणाव वाढल्यानंतर भारताने चीनमधून होणारी आयात कमी केली आहे. त्याचा मोठा परिणाम झाला आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे भारतातील संचालक अजय सहाय म्हणाले, आपल्याला कंटेनरच्या कमतरतेच्या मुद्यावर लवकरच गांभीर्याने काम करावे लागेल. एकीकडे निर्यात वाढविणे आणि आयात कमी करणे या दोन गोष्टींवर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.