नवी दिल्ली : देशात जेव्हा मोठ्या संख्येने लसीकरण पूर्ण होईल, तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करेल असे मत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या सदस्या आशिमा गोयल यांनी व्यक्त केले. मागणीमध्ये होणारी वाढ, जागतिक स्तरावरील सुधारणा आणि आर्थिक स्थितीतील सहजता यातून आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन मिळेल असे त्या म्हणाल्या. भारत सद्यस्थितीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झुंज देत आहे. मात्र, लॉकडाउन असूनही अर्थव्यवस्थेचे कमी नुकसान झाले आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत पुढे जाण्याची शक्यता कमी असल्याचेही गोयल यांनी स्पष्ट केले.
एका मुलाखतीत गोयल म्हणाल्या, भारतात लसींचे उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता आहे. या क्षेत्रात भारत लवकरच पुढे जाईल. जेव्हा लसीकरण मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचेल, तेव्हा अर्थव्यवस्थेतील मागणी, जागतिक सुधारणा आणि चांगल्या आर्थिक स्थितीमुळे भारताची कामगिरी सरस असेल.
स्थानिक स्तरावर लॉकडाउन आणि प्रतिबंध असल्याने कोरोनाच्या फैलावात घट झाल्याचे त्यांनी सांगितले. गोयल म्हणाल्या, स्थानिक गरजांनुसार निर्बंध लादण्यात आले. परिणामी मागणी-पुरवठ्याच्या साखळीला फारसा फटका बसलेला नाही. पहिल्या लाटेदरम्यान बसलेल्या फटक्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचा विस्तार सामान्य राहिला. आता कमी कालावधीत यात बदल होईल. भारत दीर्घकालीन वाढ करू शकतो. त्यामुळे रेटिंग एजन्सींनीही यासाठी कालावधी गृहीत धरला आहे. २०२४-२५ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५००० अब्ज डॉलरवर पोहोचविण्याच्या भारत सरकारच्या उद्दीष्टांबाबत गोयल म्हणाल्या, इतक्या व्यापक महामारीनंतर हे लक्ष्य गाठण्यास आणखी वेळ लागणार आहे. कोरोनाबाबतच्या अनिश्चितता अद्याप संपलेल्या नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.