नवी दिल्ली:चीनी मंडी
भारताने कच्ची साखर निर्यात करण्याचा पहिला करार केले आहे. विशेष म्हणजे, तीन वर्षांतील हा पहिला निर्यात करार आहे. केंद्र सरकारकडून निर्यातीला चालना मिळाल्यानंतर आणि न्यू यॉर्कमधील बाजारपेठेत साखरेचे दर गेल्या सात महिन्यांतील उच्चांकी पातळीवर असताना हा करार करण्यात आला आहे.
जागतिक बाजारातील साखरेचे दर देशांतर्गत बाजारातील दरांच्याही खूप खाली घसरल्यामुळे भारतातील साखर कारखाने निर्यातीसाठी उत्सुक नव्हते. पण, आंतरराष्ट्रीय पातळीवरील साखरेच्या दरांत झालेली सुधारणा आणि रुपयाची निचांकी पातळीवर झालेल्या घसरणीमुळे साखर निर्यात करणे परवडू लागले आहे.
साखर व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कारखान्यांनी २८० डॉलर प्रति टन या दराने १ लाख ५० हजार टन साखर निर्यातीचा करार केला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष ही साखर निर्यात होईल. भारताच्या आणखी निर्यातीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील भारताचे वजन वाढणार आहे. बाजारातील ब्राझील आणि थायलंड या मोठ्या साखर निर्यात देशांचा मार्केट शेअर भारताला मिळणार आहे.
भारतात प्रामुख्याने देशातील बाजारपेठेसाठी प्रक्रिया केलेली साखर तयार केली जाते. पण, देशातील साखरेचे वाढलेले उत्पादन लक्षात घेऊन, आता कारखान्यांनी कच्ची साखर उत्पादन करून ती निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात वेस्टर्न इंडिया शुगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष, बी. बी. ठोंबरे म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांत अचानक भारतातील साखर कारखान्यांसाठी बाजारात चांगले वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने निर्यातीला प्रोत्साहन दिले, रुपया गडगडला आणि त्याचवेळी न्यूयॉर्कमध्ये साखरेच्या किमती वाढू लागल्या आहेत.’
२०१८-१९च्या हंगामात निर्माण होणारी अतिरिक्त साखर निकालात काढण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच अनुदान जाहीर केले आहे. यात वाहतूक अनुदानापासून थेट शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान जमा होण्याच्या योजनेचा समावेश आहे. या निर्णयाचा लेखी आदेश मिळण्याची साखर कारखान्यांना प्रतिक्षा आहे, असे मुंबईतील एका साखर व्यापाऱ्याने सांगितले. सरकारची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर कारखान्यांनी तातडीने निर्यात करार करण्यास सुरुवात केली.
इंडियन शुगर मिल असोसिएशनचे महासंचालक अबिनाश वर्मा म्हणाले, ‘या वर्षी मार्च महिन्यात साखर कारखान्यांना २० लाख टन साखर निर्यात करण्याचे आदेश सरकारने दिले होते. यात प्रत्येक कारखान्याला निर्यात कोटा देण्यात आला होता. साखरेच्या किमती खूपच घसरल्यामुळे, गेल्या हंगामातील केवळ ४ लाख ५० हजार साखर निर्यात करण्यात कारखान्यांना यश आले.’ या वर्षी कारखाने ५० लाख टन साखर निर्यात करण्याचा प्रयत्न करतील.
दिल्लीतील एका व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार प्रक्रिया केलेली साखर आखाती देशांमध्ये आणि अफ्रिकी देशांमध्ये निर्यात होत आहे. शुगर मिल असोसिएशनच्या अंदाजानुसार यंदाच्या हंगामात ३५० लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. भारतातही साखरेला मोठी मागणी असते. भारताला वर्षाला एकूण २५० लाख टन साखर लागते. अतिरिक्त उत्पादनामुळे कारखाने सुरवातील कच्ची साखर तयार करून ती निर्यात करतील आणि हंगामाच्य शेवटच्या टप्प्यात भारतीय बाजारासाठी प्रक्रिया केलेली साखर तयार करतील, असे शुगर मिल असोसिएशनचे म्हणणे आहे.