मुंबई : देशात कोरोनाचे संक्रमण गतीने वाढले असताना भारतीय उद्योग जगताने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. यासोबतच सरकारला मदतीसाठी पावले उचलली जात आहेत. अनेक कंपन्यांनी कोविड महामारीमुळे संक्रमित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत, औषधे आणि इतर मदत केली आहे. उद्योजकांनी केवळ आपले कर्मचारीच नव्हे तर केंद्र आणि राज्य सरकारांना तसेच स्थानिक प्रशासनासह स्वयंसेवी संस्थाना मदतीची भूमिका ठेवली आहे. त्यातून गरजूंना मदत मिळत आहे.
मदतीच्या मोहिमेची सुरुवात काच वस्तू बनविणाऱ्या बोरोसिल कंपनीने केली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या चार कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना दोन वर्षांचा पगार देण्यात आला. यासोबतच इतर अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसाठी आर्थिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक मदत करीत आहेत. बोरोसिल समूहाचे मुख्य संचालक श्रीवर खेरुका यांनी सांगितले की, कोरोना संक्रमणाच्या काळात मृत झालेल्या चार कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना शैक्षणिक, वैद्यकीय तसे विमा सुविधेसह दोन वर्षांचा पगार दिला जाणार आहे.
औषध निर्माता कंपनी सन फार्मा, बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर्स यांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारची मदत करण्याचे पाऊल उलचले आहे. दुचाकी वाहन निर्माती कंपनी बजाजने कोरोना काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दोन वर्षांसाठी मदत करण्याची आणि मुलांच्या शिक्षणासह वैद्यकीय खर्च उचलण्याची घोषणा केली आहे.
रिअल इस्टेट कंपनी लोढा समुहानेही कोरोनामुळे मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना १२ महिन्यांचा पगार, इतर मदतीची घोषणा केली आहे. ऊर्जा कंपनी रिन्यू पॉवरने कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या एका कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला तीन महिन्यांचा पूर्ण पगार आणि कुटुंबाला पुढील दोन वर्षे पन्नास टक्के पगार देण्याची घोषणा केली आहे.
भारत पेट्रोलियमने अशा संकट समयी आपले योगदान देताना कोच्ची रिफायनरीतून एका शाळेतील १५०० बेडच्या कोविड हॉस्पिटलला मोफत पाणी, विजेसह ४०० टन मेडिकल ऑक्सिजन मोफत पुरवठ्याची घोषणा केली आहे.
भारत पंप्स अँड कॉम्प्रेसर लिमिटेडने केरळमध्ये एका सरकारी हॉस्पिटलला गेल्या महिन्यात मोफत मेडिकल ऑक्सिजन पुरवला. वॉल स्ट्रीटवरील दिग्गज कंपनी जे. पी. मॉर्गनचे आशियातील प्रमुख फिलिपो गोरी यांनी सांगितले की, त्यांनी भारतातील ३५,००० कर्मचाऱ्यांच्या देखभालीसाठी ३८ लाख अमेरिकन डॉलरचा निधी जमा केला आहे.
तंबाखू कंपनी आयटीसीही कोरोना संक्रमित कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाचा भार उचलत आहे. सॉफ्टवेअर कंपनी एक्सेंचर, सन फार्मा, टीव्हीएस मोटर, महिंद्रा, एअरटेल आणि एनटीपीसीसारख्या कंपन्या कोविड केंद्रांची स्थापना, वैद्यकीय उपकरणे आदींसाठी योगदान देत आहेत.