नवी दिल्ली : रुपयाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य वाढल्याने यंदा परदेशातून पाठवण्यात येणाऱ्या रकमेतही वाढ झाली आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांकडून देशात परत पाठवलेल्या रकमेत गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने वाढ होत आहे. यावर्षी परदेशात कमाई करणाऱ्या भारतीयांनी पैसे पाठवण्याचा नवा विक्रम केला आहे. जागतिक बँकेच्या मायग्रेशन अँड डेव्हलपमेंट ब्रीफच्या आकडेवारीनुसार परदेशातून देशात येणाऱ्या रकमेत यंदा १२ टक्क्यांनी वाढ झाली. वर्षअखेरीस भारतीयांनी जवळपास १०० अब्ज डॉलर्स म्हणजेच ८ लाख कोटी रुपये आपल्या देशात पाठवले असतील.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, परदेशातून आलेल्या रकमेची शेअर बाजारात येणाऱ्या एफडीआयशी तुलना केल्यास, भारतीयांनी त्यांच्या देशातील शेअर बाजारात येणाऱ्या एफडीआयपेक्षा २५ टक्के जास्त रक्कम पाठवली असती हे दिसून येते. रुपयाच्या तुलनेत डॉलरचे मूल्य वाढल्याने यंदा परदेशातून पाठवण्यात येणाऱ्या रकमेतही वाढ झाली. परदेशात राहणाऱ्या भारतीयांकडून देशात परत पाठवलेल्या रकमेत गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने वाढ होत आहे. येत्या काही वर्षांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. भारत रेमिटन्स प्राप्त करणारा जगातील पहिला देश बनला आहे. भारताने यात मेक्सिको, चीन आणि फिलिपाइन्सलाही मागे टाकले आहे. भारत, चीन, मेक्सिको, फिलीपिन्स आणि इजिप्त हे देश परदेशातून डॉलरमध्ये रेमिटन्स प्राप्त करणाऱ्या पहिल्या पाच देशांमध्ये आहेत. याबाबतच्या अहवालात म्हटले आहे की, परदेशात जाणाऱ्या भारतीयांमध्ये अत्यंत कुशल लोकांची संख्या वाढली आहे. अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हे लोक जात आहेत.