नवी दिल्ली : भारतीय पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) गंभीर आर्थिक आणि इंधन संकटात असलेल्या श्रीलंकेत ५० पेट्रोल पंप सुरू करून आपल्या व्यवसायाचा विस्तार करणार आहे. आयओसीच्या श्रीलंकेतील युनिट लंका आयओसी (एलआयओसी) चे कार्यकारी संचालक मनोज गुप्ता यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, पेट्रोल पंपात तेल साठवणुकीचे टँकर व इतर गरजेच्या उपकरणांची जबाबदारी कंपनी उचलेल. तर जमीन आणि इतर पायाभूत सुविधांचा खर्च पंपचालक करतील. मनोज गुप्ता म्हणाले की, आम्हाला ५० नवे पंप सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. याबाबत श्रीलंकेच्या सरकारचे आभार मानतो.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीलंकेत या वर्षाच्या सुरुवातीला इंधनाची प्रचंड टंचाई दिसून आली होती. विदेशातून तेल खरेदीसाठी पुरेसे परकीय चलन नसल्याने श्रीलंकेला पुरेसा इंधन पुरवठा केला जाऊ शकत नव्हता. यादरम्यान अनेकदा पेट्रोल, डिझेलचे दर वाढविण्यात आले आहेत. या संकटकाळात जुन, जुलैमध्ये एलआयसी पेट्रोलियम उत्पादनांची विक्री करणारी एकमेव कंपनी होती. श्रीलंकेच्या सरकारी तेल कंपनी सीपीसीचा पुरवठा जूनच्या मध्यापासून बंद आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही वाढ झाली आहे.