नवी दिल्ली : खरीप पिकाच्या अगोदर बासमती तांदळावरील किमान निर्यात किंमत (MEP) हटवल्याने देशातील कोट्यवधी शेतकरी आणि निर्यातदार दोघांनाही फायदा होईल, असा दावा उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी केला आहे. व्यापारातील अडथळे दूर केल्याने भारतीय निर्यातदारांना परदेशातील बाजारपेठांमध्ये पुन्हा शिरकाव करण्याची संधी मिळणार आहे.
KRBL लिमिटेडचे बल्क एक्स्पोर्ट्स हेड अक्षय गुप्ता यांच्या मते, बासमती तांदळावरील MEP काढून टाकणे ही एक महत्त्वाची वाटचाल आहे. ज्यामुळे शेतकरी आणि निर्यातदार दोघांनाही लक्षणीय फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. या बदलामुळे धानाच्या किमती 7-10 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. MEP हटविल्याने निर्यातदार अधिक सक्षमपणे निर्यात करू शकतात, असेही ते म्हणाले. KRBL चे गुप्ता पुढे म्हणाले कि, आम्ही आफ्रिका आणि आग्नेय आशियातील उदयोन्मुख बाजारपेठांवर लक्ष्य केंद्रित केले आहे, जेथे ग्राहक बासमतीच्या तांदळाला जादा पसंती देतात.
जागतिक बाजारपेठेत भारत बासमती तांदळाचा प्रमुख निर्यातदार आणि उत्पादक देश आहे. त्यानंतर शेजारी पाकिस्तानचा क्रमांक लागतो. APEDA नुसार, भारताने 2023-24 मध्ये 5.2 दशलक्ष टन बासमती तांदूळ 48,389.18 कोटी रुपयांना निर्यात केला होता. गेल्या वर्षी सौदी अरब, इराण, इराक, यूएई, अमेरिका आणि येमेन ही तांदळाची प्रमुख निर्यात ठिकाणे होती. DRRK फूड्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अमित मारवाह म्हणाले कि, सरकारने घेतलेला निर्णय उद्योगासाठी फायदेशीर आहे. एमईपी हटवल्यापासून बासमती तांदळाच्या किमती वाढू लागल्या आहेत. याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, कारण त्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळेल. MEP काढून टाकल्यानंतर, बासमती तांदळाची अवास्तव किंमत रोखण्यासाठी आणि निर्यात पद्धतींमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सरकार आणि त्याची निर्यात सुविधा शाखा APEDA आता निर्यात करारांवर बारकाईने लक्ष ठेवेल.