मुंबई: देशात गेल्या दोन आठवड्यात साखरेच्या किमती ६ टक्क्यांपेक्षा अधिक वाढल्या आहेत. उन्हाळी हंगामात ग्राहकांकडून साखरेची मागणी वाढेल. शिवाय, उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याची माहिती साखर उद्योगातील अधिकाऱ्यांनी रॉयटर्सशी बोलताना दिली. देशांतर्गत किंमत वधारल्याचा फायदा बलरामपूर शुगर, श्री रेणुका शुगर्स, दालमिया भारत शुगर आणि द्वारिकेश शुगर यांसारख्या साखर उत्पादकांना होणार आहे. या कंपन्यांच्या मार्जिनमध्ये सुधारणा होईल, त्यातून शेतकऱ्यांना उसाची बिले वेळेवर देण्यास मदत होईल, असे डिलर्सनी सांगितले.
मात्र, या दरवाढीमुळे अन्नधान्याच्या महागाईला आणखी चालना मिळेल. तसेच केंद्र सरकारकडून अतिरिक्त साखर निर्यातीला परवानगी नाकारली जावू शकते. जागतिक स्तरावर साखरेच्या दरवाढीला ते पूरक ठरेल असे उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
याबाबत, बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सांगितले की, सर्वाधिक साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रातील उत्पादनात घट झाल्यामुळे साखरेचे दर वाढत आहेत. ३० सप्टेंबर रोजी संपणाऱ्या २०२२-२३ या हंगामात राज्यात सुमारे १०.५ दशलक्ष टन साखर उत्पादनाचे अनुमान आहे. यापूर्वी यंदाचे साखर उत्पादन १३.७ दशलक्ष टन होईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. उन्हाळ्याच्या कालावधीत साखरेची मागणी वाढणे अपेक्षित आहे. त्यामुळे आणखी दरवाढीची शक्यता असल्याचे असे ते म्हणाले.
लग्नसराई तसेच उन्हाळ्यात देशात थंड पेये, आईस्क्रीमचा वापर वाढत असल्याने साखरेची मागणी वाढते. गेल्यावर्षीच्या कोविड-१९ साथरोगानंतर व्यवहार पूर्ववत झाल्याने खप वाढला आहे. यंदा उच्चांकी २८ दशलक्ष टनापर्यंत हा खप पोहोचू शकतो असे मुंबईस्थित एका डिलरनी सांगितले. सरकारकडून अतिरिक्त साखर निर्यातीस परवानगी मिळण्याची शक्यता नाही. अधिक मागणीमुळे हंगामाच्या अखेरीस, गेल्या सहा वर्षात सर्वात कमी, ५.५ दशलक्ष टन एवढाच साखर साठा राहिल. साखर उत्पादनातील घसरणीमुळे केंद्राने यंदा ६.१ दशलक्ष टन साखर निर्यातीस परवानगी दिली. गेल्या हंगामात उच्चांकी ११ दशलक्ष दन साखर निर्यात करण्यात आली होती.